Lockdown Efect : व्यापार ठप्प; ५०० कोटींचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 10:58 AM2020-04-28T10:58:37+5:302020-04-28T10:58:44+5:30
३२ दिवसांपासून व्यापारपेठ कडकडीत बंद असून सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात २५ मार्चपासून आजतागायत संचारबंदी आणि लॉकडाऊन कायम आहे. यामुळे गेल्या ३२ दिवसांपासून व्यापारपेठ कडकडीत बंद असून सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे आज (२६ एप्रिल) अक्षय तृतीयेचा सण असताना सराफा बाजार बंद राहिल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध स्वरूपातील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार, गर्दी टाळण्याकरिता २५ मार्चपासून जीवनावश्यक साहित्य विक्रीची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने सुरू ठेवण्यास सक्तीने मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांसह ग्रामीण भागातील व्यापार गत ३२ दिवसांपासून पूर्णत: ठप्प झाला आहे. त्यात प्रामुख्याने कपडा, संसारोपयोगी भांडी, कुलर, एसी, फ्रीज, वाहन, सोने-चांदी विक्रीवर संक्रांत ओढवली आहे. तथापि, ऐन लग्नसराईच्या हंगामात कोरोनाच्या संकटाने ओढवलेल्या या आरिष्टामुळे आतापर्यंत सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. ही स्थिती यापुढेही ३ मे पर्यंत अर्थात आठवडाभर कायम राहणार असून नुकसानात आणखीनच भर पडणार असल्याने जिल्ह्यातील सर्वच व्यापारी हैराण झाले आहेत. विशेषत: सर्वाधिक सोने-चांदी खरेदी होणाऱ्या अक्षय तृतीया या सणाला सराफा बाजार बंद राहिल्याने व्यावसायिकांना मोठा फटका बसला.
लग्नसोहळे रद्द; कोट्यवधींचा कपडा दुकानातच पडून
कोरोनाच्या संकटामुळे संचारबंदी लागू असून पाचपेक्षा अधिक लोक एकाच ठिकाणी एकत्र न येण्याच्या सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे मार्चचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण एप्रिल महिन्यातील नियोजित लग्नसोहळे रद्द झाले आहेत. त्याचा थेट परिणाम कपडा मार्केटवर झाला आहे. लग्नसोहळेच रद्द झाल्याने सट्टा खरेदीचा प्रश्नच राहिला नाही. यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कोट्यवधींची गुंतवणूक करून खरेदी केलेला कपडा दुकानांमध्ये तसाच पडून आहे. ३ मे रोजी ‘लॉकडाऊन’ संपुष्टात आल्यास काही प्रमाणात व्यापार होऊ शकतो.
एकाच दिवशी 10 कोटींचे नुकसान
साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाºया अक्षय तृतीया सणाला सोने-चांदी खरेदी केली जाते. यंदा मात्र जिल्ह्यातील ४०० दुकाने लॉकडाऊनमुळे बंद राहिल्याने एकाच दिवशी सरासरी १० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज सराफा व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष उकळकर यांनी वर्तविला.
मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये लग्नसराईची धूम असते. त्यामुळे जिल्ह्यातील कपडा, सराफा मार्केट ग्राहकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून जाते. यावर्षी मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर गत ३२ दिवसांपासून संपूर्ण व्यापारपेठ बंद असल्याने सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाले आहे.
- जुगलकिशोर कोठारी, जिल्हाध्यक्ष, व्यापारी मंडळ, वाशिम
जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळेच कोरोना विषाणू संसर्गाबाबत जिल्ह्याची कामगिरी सरस ठरली. एकमेव रुग्ण ठणठणीत झाल्याने सद्या जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे साहजिकच व्यापाºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले; मात्र सर्वांनीच अपेक्षित सहकार्य केल्याने यश मिळू शकले. शासनस्तरावरून निर्देश प्राप्त झाल्यास ३ मे नंतर परिस्थिती बºयापैकी पुर्वपदावर येईल.
- हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम