‘लॉकडाऊन’चा लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 04:13 PM2020-07-19T16:13:32+5:302020-07-19T16:13:58+5:30
बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशात ‘लॉकडाऊन’ आहे. मार्च ते जून या दरम्यान रसवंत्या बंद राहिल्याने तसेच बाजारपेठ न मिळाल्याने रिसोड तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. शासनाने आर्थिक मदत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्य शासनाकडे १८ जुलै रोजी केली.
यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे मार्च ते मे या महिन्यात लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतरही रसवंती अन्य लघु व्यवसायांना मुभा मिळाली नाही. रिसोड तालुक्यात जवळपास १६४ एकर क्षेत्रावर लिंबू शेती आहे. दरवर्षी उन्हाळयाच्या दिवसात लिंबूला बऱ्यापैकी मागणी असते. रसवंतीवाले अगोदरपासूनच लिंबूची मागणी नोंदवितात. शरबत व अन्य कारणांसाठीदेखील लिंबूची खरेदी होते. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गामुळे ऐन हंगामात रसवंत्या बंद होत्या. त्यामुळे लिंबूची मागणीही आपसूकच घटली. व्यापाºयांकडून लिंबूचा उठावही झाला नाही. काही शेतकºयांनी स्वत: भाजीबाजारात लिंबूची विक्री केली. परंतू, बाजारभाव समाधानकारक मिळाला नाही. लिंबूची मागणी नसल्याने काही ठिकाणी लिंबूची फळे ही झाडालाच सडल्याची माहिती शेतकरी बबनराव मोरे यांनी दिली. झाडाला भरपूर प्रमाणात लिंबू लागले; परंतु मागणी नसल्याने शेतकरी हताश झाल्याचे दिसून येते.
सहा वर्षांपूर्वी तीन एकर शेतात लिंबूची लागवड केली. दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न होते. यावर्षी कोरोनामुळे लिंबूला मागणी नाही तसेच बाजारपेठही नव्हती. त्यामुळे लिंबू उत्पादक शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे. शासनाने आर्थिक मदत करावी, अशी आमची मागणी आहे.
-बबनराव मोरे,
लिंबू उत्पादक शेतकरी, निजामपूर