‘लॉकडाऊन’; रिसोड, मंगरूळपिरात चवथ्या दिवशीही सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 04:13 PM2020-07-18T16:13:03+5:302020-07-18T16:13:44+5:30
चवथ्या दिवशीही १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास या दोन्ही शहरात सामसूम दिसून आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड, मंगरूळपीर येथे १५ जुलैपासून लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी सुरू झाली असून, चवथ्या दिवशीही १८ जुलै रोजी दुपारच्या सुमारास या दोन्ही शहरात सामसूम दिसून आली. दरम्यान गत तीन दिवसात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४० वर पोहचली असून, यापैकी १९७ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. जुलै महिन्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येचा वेग झपाट्याने वाढत असल्याने कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी मंगरूळपीर, रिसोड या शहरांमध्ये तसेच लगतच्या काही गावांमध्ये १५ जुलैपासून सात दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने १३ जुलै रोजी घेतला होता. या कालावधीत सर्व दुकाने, आस्थापना, खासगी कार्यालये, पेट्रोलपंप, बँक बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते १० वाजता या दरम्यान केवळ दुध व भाजीपाला विक्री सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. या दोन्ही शहरांमध्ये महसूल व पोलीस प्रशासनातर्फे लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, चवथ्या दिवशीही १८ जुलै रोजी बाजारपेठ कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. दवाखाने व मेडीकलचा अपवाद वगळता उर्वरीत दुकाने बंद असल्याने बाजारपेठ तसेच रस्त्यांवर शुकशुकाट आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाºया ६५ जणांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. सकाळी ७ ते १० या वेळेत दुध, भाजीपाला खरेदीसाठी रिसोड व मंगरूळपीर शहरात नागरिकांची काही प्रमाणात लगबग दिसून येते. शहरात येणाºया व शहरातून बाहेर जाणाºया प्रत्येकाची पोलीस पथकाकडून चौकशी केली जात आहे. कुणी विनाकारण फिरताना आढळून आल्यास समज देण्याबरोबरच दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे.
दरम्यान, लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू असताना, रिसोड व मंगरूळपीर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याने चिंतेत अधिकच भर पडत असल्याचे दिसून येते. १७ जुलै रोजी रिसोड येथे आठ तर मंगरूळपीर येथे ११ जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाला.