रिसोड, मंगरूळपीर शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 05:14 PM2020-07-22T17:14:37+5:302020-07-22T17:14:52+5:30
दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मंगरूळपीर व रिसोड शहरात १५ ते २१ जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते. २२ जुलैपासून या दोन्ही शहरातील ‘लॉकडाऊन’ शिथिल केले जाणार असून, जिल्ह्यातील उर्वरित चार शहरांप्रमाणेच या दोन्ही शहरातही ३१ जुलै २०२० पर्यंत यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, आस्थापना, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांना २१ जुलै रोजी जारी केला. सर्व दवाखाने (पशुवैद्यकीयसह), मेडिकल २४ तास सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिसोड व मंगरूळपीर शहरात १५ जुलैपासून सात दिवस संपूर्ण लॉकडाऊन आहे. मंगळवार हा लॉकडाऊनचा शेवटचा सातवा दिवस होता. २२ जुलैपासून ते ३१ जुलैपर्यंत रिसोड नगरपालिका (निजामपूर, घोन्सर , सवड गावांसह) हद्दीत आणि मंगरूळपीर नगरपालिका (जांब ग्रामपंचायतमधील सोनखास, मुतीर्जापूर, शहापूर, शेलगाव या गावांसह) हद्दीत यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठाने, सेवा सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. दवाखाने, मेडिकल स्टोअर २४ तास सुरु राहतील. सहाही शहरांमध्ये केवळ दुध संकलनास सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. मात्र, या काळात दुध विक्री करण्यास मनाई राहील.
दरम्यान, महामार्गांची कामे नेहमीप्रमाणे सुरु ठेवता येतील. सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत, असे आदेशात नमूद आहे.