लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत: केशरी शिधापत्रिकांना धान्य मे महिन्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:15 PM2020-04-13T17:15:28+5:302020-04-13T17:16:00+5:30
मेपासून योजनेचा लाभ देण्यात काय अर्थ, असा प्रश्न वंचित शिधापत्रिकाधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात स्वस्तधान्य दुकानांतून मोफत धान्य अंत्योदय तथा प्राधान्य शेतकरी म्हणजे पिवळे कार्डधारकांना वितरीत करण्यात आहे. यात केशरी शिधापत्रिकाधारक वंचित असल्याने त्यांनाही धान्य देण्याचे आदेश निर्गमित केले; परंतु केशरी शिधापत्रिकांवर त्याचा लाभ मे महिन्यापासून मिळणार आहे. प्रत्यक्षात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंतच असताना मेपासून योजनेचा लाभ देण्यात काय अर्थ, असा प्रश्न वंचित शिधापत्रिकाधारकांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्यशासनाने अंत्योदय आणि जिल्ह्यातील केशरी (एपीएल) शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ दिला जाणार आहे. मे व जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे. प्रत्यक्षात गेल्या २३ दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची पाळी आली असताना शासनाने सर्वसामान्यांचा विचार करूनच स्वस्तधान्य वितरणाचा निर्णय घेणे अपेक्षीत होते. तथापि, तूर्तास ३० एप्रिलपर्यंतच लॉकडाऊनचे आदेश असताना केशरी शिधापत्रिकांना मे आणि जून महिन्यात धान्य पुरवठा करण्यात काय अर्थ, असा प्रश्न सर्वसामान्यांसह केशरी शिधापत्रिकाधारकांकडून उपस्थित केला जात आहे.