Lok Sabha Election 2019 : वाशिमकडे सर्वच उमेदवाराचे दुर्लक्ष; सर्व लक्ष यवतमाळकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:30 PM2019-04-08T13:30:33+5:302019-04-08T13:30:42+5:30
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणारे वाशिम जिल्हयातील दोन विधानसभा मतदारसंघाकडे उमेदवारांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने मतदारांमध्येही अजुन कोणीच कसे भेटायला आले नाही याची चर्चा होताना दिसून येत आहे.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निवडणूक म्हटल की, सर्वत्र गडबड धाई, भोंग्यांचा आवाज, नेत्यांच्या सभा, उमेदवारांच्या मतदारांच्या भेटी हे सर्वश्रृत आहे. परंतु वाशिम जिल्हयात एक दोन सभा वगळता सर्वत्र शांतता दिसून येत आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणारे वाशिम जिल्हयातील दोन विधानसभा मतदारसंघाकडे उमेदवारांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने मतदारांमध्येही अजुन कोणीच कसे भेटायला आले नाही याची चर्चा होताना दिसून येत आहे.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये यवतमाळ जिल्हयातील चार व वाशिम जिल्हयातील कारंजा-मानोरा, वाशिम व मंगरुळपीर हे विधानसभा मतदार संघ येतात. सर्वाधिक मतदार यवतमाळ जिल्हयात येत असल्याने सर्वच उमेदवारांची धाव यवतमाळकडे दिसून येत आहे. तर काहींनी केवळ उडत्या भेटी देवून इतर कार्य मर्जीतील पदाधिकाऱ्यांकडे देवून टाकले आहे. ज्या पदाधिकाऱ्यांकडे काम दिले आहेत ते आपल्याच तोºयात वागत असून ते केवळ वेळ काढून नेत असल्याचे दिसून येत आहे. खासदार भावना गवळी वाशिम जिल्हयातील असल्याने त्यांना जिल्हयाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नाही तरी चालेल, कारण त्यांचा जनसंपर्क जिल्हयामध्ये तेवढा दिसून येतो. तरी सुध्दा मतदारांमध्ये गैरसमज नको म्हणून त्यांनी वाशिम , मंगरुळपीर शहरातून रॅली, सभा आयोजित केली आहे. काँग्रेसच्यावतिने मात्र अद्याप कोणतीच सभा व प्रचार रॅली काढण्यात आली नाही. काँग्रेसची जबाबदारी जिल्हयातील काही नेत्यांकडे सोपविली आहे. परंतु ज्या नेत्यांकडे सोपविली आहे त्यांच्याबाबत पक्षातीलच काही नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची नाराजी असल्याने पाहिजे त्या प्रमाणात जिल्हयात काम होतांना दिसून येत नाही. तसेच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बºयाच दिवसांपासून राजकारातून दूर राहिलेल्या नेत्यांकडे जबाबदारी सोपविल्याने सक्रीय कार्यकर्ते नाराज झालेत. विशेषत राष्टÑवादी काँग्रेस पक्षामध्ये सुध्दा दोन गट असून यांच्यामध्ये मानापमान, रुसवे फुगवे सुरु आहेत. यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचे होणारे काम अंतर्गत कलाहामुळे थंडबस्त्यात पडले आहे. भाजपाचे बंडखोर उमेदवार पी.बी. आडे यांनी या भागातील सर्व काम जिल्हयात कोणाच्याच ओळखीचे नसलेल्या अशा कार्यकर्त्याकडे दिले आहे. यांच्या हितचिंतकाने उमेदवाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला की, त्याला जबाबदारी सोपविलेल्या व्यक्तिचा भ्रमणध्वनी नंबर देवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना फोन केल्यानंतर अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने सुध्दा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच वंचित आघाडीचे उमेदवार प्रविण पवार यांचे तर अद्याप वाशिम जिल्हयातील मतदारांना दर्शन सुध्दा झालेले दिसून येत नाही. भारिप-बमसंचे जिल्हयाध्यक्ष युसूफ पुंजानी यांच्या जनसपंर्काव्यतिरिक्त त्यांचे जिल्हयात कुठेही अस्तित्व दिसून येत नाही. प्रहार जनशक्तीच्या वैशाली येडे यांनी उमेदवारी जाहीर करण्याआधिच काही जणांची भेट घेवून व उमेदवारी अर्ज भरतांना वेगळेपणा दाखवून आपली ओळख निर्माण केली आहे. प्रमुख उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार जिल्हयातील मतदारांना अद्याप भेटले नसल्याने मतदारांसमोर सुध्दा काय करावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.