Lok Sabha Election 2019 : ‘नाराजां’ची मोट बांधताना उमेदवारांची दमछाक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 02:41 PM2019-04-06T14:41:15+5:302019-04-06T14:42:33+5:30

वाशिम : अवघ्या पाच दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली असतानाही, अजून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला नाही. पक्षांतर्गत विरोधक आणि मित्रपक्षांच्या नाराजांची मोट बांधण्यातच प्रमुख उमेदवारांची शक्ती खर्च होत आहे.

 Lok Sabha Election 2019: Candidates' tired while convincing rebels | Lok Sabha Election 2019 : ‘नाराजां’ची मोट बांधताना उमेदवारांची दमछाक!

Lok Sabha Election 2019 : ‘नाराजां’ची मोट बांधताना उमेदवारांची दमछाक!

Next

- संतोष वानखडे 
 
वाशिम : अवघ्या पाच दिवसांवर निवडणूक येऊन ठेपलेली असतानाही, अजून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहचला नाही. पक्षांतर्गत विरोधक आणि मित्रपक्षांच्या नाराजांची मोट बांधण्यातच प्रमुख उमेदवारांची शक्ती खर्च होत आहे. दुसरीकडे बंडखोर उमेदवारावर भाजपाने अद्याप कारवाई केली नसल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होत असून, एकूण २४ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे, शिवसेना युतीच्या भावना गवळी, भाजपाचे बंडखोर पी.बी. आडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रविण पवार असे प्रमुख चार उमेदवार असले तरी काँग्रेस व सेनेच्या उमेदवारात काट्याची लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि मित्रपक्षातील काही गटांची नाराजी ही सेना आणि काँग्रेस उमेदवारांची डोकेदुखी वाढविणारी बाब ठरत असल्याची चर्चा आहे. यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तब्बल पाच विधानसभा मतदारसंघात सेना-भाजपाचे आमदार असतानाही अंतर्गत वितुष्ट, श्रेष्ठत्वाची लढाई, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न आदी भूतकाळातील प्रसंग हे वर्तमानात सेना उमेदवारास अडचणीचे ठरत असल्याचे बोलले जात आहे. पक्षश्रेष्ठींनी अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याच्या सूचना मतदारसंघातील नेत्यांना दिल्या असल्या तरी पक्षांतर्गत दुसऱ्या गटातील कार्यकर्ते अजूनही प्रचारात उत्स्फुर्तपणे दिसत नसल्याने नाराजांची मोट बांधण्यातच सेना उमेदवाराचा अधिकाधिक वेळ खर्ची पडत असल्याची चर्चा आहे. ऐन निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची दखलही वरिष्ठ स्तरावर घेतली जात असल्याने, असंतुष्टांची नाराजी मतदानापर्यंत कायम राहते की मनोमिलन होते, यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे.
दुसरीकडे काँग्रेस-राकाँ व मित्रपक्षाच्या आघाडीतही सर्व काही आलबेल असल्याचे वातावरण नसल्याने सध्यातरी निवडणुकीचे चित्र ‘विचित्र’ असल्याचे दिसून येते. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा फटका बसू नये म्हणून नाराज कार्यकर्त्यांना कुरवाळण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षांतर्गतचे असंतुष्ट आणि मित्रपक्षातील नाराज मंडळीची नाराजी दूर करण्यातच अधिकाधिक वेळ खर्ची पडत आहे. जातीय व धार्मिक समिकरण जुळवितानाही दमछाक होत असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेसच्या परंपरागत ‘व्होट बँके’ला खिंडार पडत असल्याने ही पोकळी भरून काढण्याचे आव्हान काँग्रेससमोर उभे ठाकले आहे. एकंदरीत, पक्षांतर्गत तसेच मित्रपक्षातील नाराजांची मोट बांधणे, रुसवे, फुगवे काढण्यातच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा अधिकाधिक वेळ खर्ची पडत असल्याने, निवडणूक प्रचाराने अजूनही वेग घेतला नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
बंडखोरासोबत भाजपाची फळी; पक्षविरोधी कारवाईला बगल
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाजपाचे प्रदेश सदस्य पी.बी. आडे यांनी बंडाचे निशान फडकावत उमेदवारी दाखल केली. यवतमाळ जिल्ह्यातील भाजपाच्या एका मोठ्या गटाकडून आडे यांना रसद पुरविली जात असल्याने आणि हे लोण वाशिम, कारंजा मतदारसंघातही पोहचत असल्याची चर्चा आहे. अंतर्गत गटबाजीमुळे आधीच सेना ‘चर्चे’त आलेली असताना, त्यात भाजपकडून छुप्प्या पद्धतीने वार होत आहेत. पक्षविरोधी कारवाई केली म्हणून एरव्ही कार्यकर्त्यांवर लगेच कारवाईचा बडगा उगारला जातो. येथे मात्र युतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भाजपाकडून उघड बंडखोरी झाल्यानंतरही निलंबनासारखी कठोर कारवाई झाली नाही. कारवाईला सोयीस्कररित्या बगल मिळत असल्याने राजकीय गोटातून तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Web Title:  Lok Sabha Election 2019: Candidates' tired while convincing rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.