Lok Sabha Election 2019 : छुपी गटबाजी शमविण्याचे उमेदवारांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 04:51 PM2019-04-01T16:51:00+5:302019-04-01T16:51:08+5:30

वाशिम : विरोधकांचे हल्ले परतवून लावण्याबरोबरच स्वपक्षातील छुपी गटबाजी शमविण्याचे आव्हान, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख उमेदवारांना पेलावे लागत आहे.

Lok Sabha Election 2019 : Challenge off tackel with rebeal before candidates  | Lok Sabha Election 2019 : छुपी गटबाजी शमविण्याचे उमेदवारांसमोर आव्हान

Lok Sabha Election 2019 : छुपी गटबाजी शमविण्याचे उमेदवारांसमोर आव्हान

Next

- संतोष वानखडे
 
वाशिम : विरोधकांचे हल्ले परतवून लावण्याबरोबरच स्वपक्षातील छुपी गटबाजी शमविण्याचे आव्हान, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख उमेदवारांना पेलावे लागत आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी केल्यामुळे सेना उमेदवारापुढील अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येते.
अख्खा राज्याचे लक्ष वेधून घेणारा मतदारसंघ म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री यासह काँग्रेस, राकाँच्या दिग्गज उमेदवारांमुळे यवतमाळ-वाशिम मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. यावेळीदेखील शिवसेना-भाजपा युतीच्या विरोधात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राकाँ व मित्रपक्षातर्फे माणिकराव ठाकरे, शिवसेना-भाजपा युतीच्या भावना गवळी, भाजपाचे बंडखोर पी.बी. आडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रविण पवार यांच्यासह एकूण २४ उमेदवार नशीब आजमावत आहेत. ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून, प्रचारासाठी उमेदवारांना १० दिवस उरले आहेत. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसमोर पक्षांतर्गत छुपी गटबाजी, असंतुष्टांची नाराजी दूर करण्याचे प्रमुख आव्हान असल्याचे दिसून येते. शिवसेनेत खासदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड यांच्यातील गटबाजी वाशिम, यवतमाळ जिल्ह्याने यापूर्वी अनुभवली आहे. लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी गवळी व राठोड यांच्यामध्ये यशस्वी शिष्टाई केली असली तरी दोघांचेही समर्थक हे भूतकाळातील ‘पोस्टर वॉर’ अजून विसरलेले नाहीत. सोबतच भाजपातील असंतुष्ट, दुखावलेल्या काही लोकप्रतिनिधी, नेत्यांची नाराजी दूर करण्याची कसरतही शिवसेनेला करावी लागणार आहे. दुसरीकडे उमेदवारीवरून काँग्रेसमध्येही छुपी गटबाजी असल्याचे समोर आले होते. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस नेते जीवन पाटील यांच्या समर्थकांबरोबरच वाशिम जिल्ह्यातील काँग्रेसला एकसंघ ठेवण्याची कसरतही काँग्रेस उमेदवाराला करावी लागणार आहे. वाशिम जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजीमुळेच जिल्हा परिषदेत सभापती पदाच्या निवडणुकीत बहुमत असतानाही काँग्रेस उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसच काँग्रेसला पाडू शकते, असेही काँग्रेसमध्ये खासगीत बोलले जाते. छुप्या गटबाजीचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटणार नाहीत, याची दक्षता माणिकराव ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे. राकाँ पदाधिकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य लाभेल, याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. काँग्रेस नेते विश्वासात घेत नसल्याचा सूर राष्टÑवादी काँग्रेसमधील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांतून निघताना दिसून येत आहे. दुसरीकडे कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघातही भारिप-बमसंमध्ये छुपी गटबाजी असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले. कारंजा नगर परिषदेच्या अर्थसंकल्पीय व अन्य काही सभेतही याचे पडसाद उमटले होते. त्यामुळे ही छुपी गटबाजी शमविण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे प्रविण पवार यांना पेलावे लागणार आहे. एकंदरीत पक्षांतर्गत छुपी गटबाजी शमवून मित्रपक्षांना बरोबर घेत विरोधकांची व्यूहरचना भेदून कोण काढतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.
 
कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचा मुद्दा ठरतोय अडचणीचा

विधानसभेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. कारंजा-मानोरा मतदारसंघात शिवसेनेतून भाजपावासी झालेले राजेंद्र पाटणी यांनी विजय मिळविला होता. साधारणत: एका वर्षापूर्वी कारंजा विधानसभेची उमेदवारी देण्याच्या अटीवर, राकाँचे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी खासदार भावना गवळी यांच्या माध्यमातून ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश घेतला. आता भाजपा-शिवसेना अशी युती असल्याने आणि कारंजा विधानसभा मतदारसंघात राजेंद्र पाटणी हे भाजपाचे आमदार असल्याने डहाके यांची कोंडी होण्याची शक्यता राजकीय गोटातून वर्तविली जात आहे. दुसरीकडे शिवसेनेने कारंजा मतदारसंघाचा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला तर भाजपाचे आमदार पाटणी यांची डोकेदुखी वाढू शकते. कारंजा मतदारसंघातील या संभाव्य रणनितीचे पडसाद लोकसभा निवडणुकीत उमटत असल्याने डहाके आणि पाटणी समर्थकांची नाराजी ओढवली जाणार नाही, याची पुरेपूर दक्षता शिवसेनेच्या भावना गवळी यांना घ्यावी लागणार आहे.


भाजप बंडखोराने वेधले सर्वांचे लक्ष
४भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य पी.बी. आडे यांनी बंडखोरी करीत लक्ष वेधले आहे. आडे यांची उमेदवारी कुणाच्या फायद्याची व कुणाच्या तोट्याची यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. बंजारा समाजाचे पाठबळ हा आडे यांचा एकमेव प्लस पॉर्इंट आहे. आडे यांची उमेदवारी शिवसेनेच्या हक्काच्या मतांना सुरूंग लावते की काँग्रेससाठी डोकेदुखी ठरते, यावर चर्चा झडत आहेत. एकंदरीत भाजपा बंडखोराला ‘बुस्ट’ देणारे युतीतील काही नेते अखेरपर्यंत आडेंच्या मागे राहतात का? यावरही निवडणुकीचे बरेच चित्र अवलंबून राहणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 : Challenge off tackel with rebeal before candidates 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.