Lok Sabha Election 2019 : वाशिम-यवतमाळ मतदारसंघात मातब्बरांचे राजकीय अस्तित्व पणाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:48 PM2019-03-30T14:48:51+5:302019-03-30T14:49:03+5:30

वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह प्रमुख पक्षांशी बंड करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच सिद्ध करणारी ठरणार आहे.

 Lok Sabha Election 2019: In the Washim-Yavatmal constituency, the political existence on the stake | Lok Sabha Election 2019 : वाशिम-यवतमाळ मतदारसंघात मातब्बरांचे राजकीय अस्तित्व पणाला !

Lok Sabha Election 2019 : वाशिम-यवतमाळ मतदारसंघात मातब्बरांचे राजकीय अस्तित्व पणाला !

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह प्रमुख पक्षांशी बंड करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच सिद्ध करणारी ठरणार आहे. सलग चार वेळा लोकसभेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या भावना गवळी, काँग्रेसकडून प्रथमच लोकसभा उमेदवारी मिळविणारे माणिकराव ठाकरे यांच्यासह भाजपच्या राजकारणात मोठे स्थान असतानाही, बंड करून उमेदवारी दाखल करणारे पी. बी. आडे यांच्या केवळ विजयावरच त्यांचे राजकीय अस्तित्व अवलंबून राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट दिसत आहे. या मतदारसंघात चुरशीची लढत आहे.
शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी १९९९ पासून लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी १९९९ आणि २००४ या दोन निवडणुकीत वाशिम, तर त्यानंतर पुनरर्चनेत निर्माण झालेल्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात २००९ आणि २०१४ असा दोन वेळा विजय मिळविला. तथापि, सतत चारवेळा लोकसभेत खासदार म्हणून म्हणावा तेवढा विकास त्यांना साधता आला नसल्याची खंत मतदारांत व्यक्त होत असतानाच आता युतीच्या अंतर्गत गटबाजीनेही त्यांचे राजकीय अस्तित्व अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माणिकराव ठाकरे यांचा विचार करता दोन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची एकप्रकारे दुर्मिळ संधी माणिकराव ठाकरे यांना मिळाली होती. आॅगस्ट २००८ मध्ये प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या ठाकरे यांनी या पदावर सहा वर्षे पूर्ण केली. राज्यात काँग्रेसचा सहा वर्षे एवढे दीर्घकाळ अध्यक्षपद भूषविणारे ठाकरे हे पहिलेच अध्यक्ष आहेत. १९९० च्या दशकात राज्य युवक काँग्रेसचे पाच वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. स्व.विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केले आहे. गत लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान खासदार भावना गवळी यांना जोरदार लढत देणारे शिवाजीराव मोघे यांना डावलून काँग्रेसने माणिकरावांना उमेदवारी दिली. दारव्हा विधानसभेतील पराभवानंतरही पक्षासाठी केलेले कार्य लक्षात घेऊनच त्यांना ही संधी देण्यात आली आहे. तथापि, या संधीचा फायदा ते कसे उठवतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. हीच स्थिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पी. बी. आडे यांचीही आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पी. बी. आडे यांनी बंडाचे निशाण फडकावत अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांची डोकेदुखी वाढली आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीत विजय मिळविण्याचा विश्वास आडे यांना वाटत असावा; त्यामुळे आता या निवडणुकीतील विजयावरच त्यांचे राजकीय अस्तित्व अवलंबून आहे.
 
मतांचे ध्रुवीकरण ठरणार निर्णायक

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदार संघात मतांचे ध्रुवीकरण निर्णायक भूमिका वठविणार आहे. यवतमाळमध्ये महागाव तालुक्यातील जवळपास ४० मतदान केंद्रांचा समावेश आहे. या सर्व मतदान केंद्रांवर बंजारा मतांचे प्राबल्य आहे. या भागात आडे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा सर्वाधिक फटका विद्यमान खासदारांनाच बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे माणिकराव ठाकरे यांना धोका आहे. पी. बी. आडे यांचा मतदार संघावर कितपत प्रभाव आहे, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

Web Title:  Lok Sabha Election 2019: In the Washim-Yavatmal constituency, the political existence on the stake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.