यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड?
By विशाल सोनटक्के | Published: April 3, 2024 05:53 PM2024-04-03T17:53:56+5:302024-04-03T17:56:43+5:30
Lok sabha election 2024 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मागील १५ दिवसांपासून महायुतीतील लोकसभा उमेदवारीवरून गोंधळाची स्थिती आहे.
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहील, असे आमदार संजय राठोड यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राठोड हेच महायुतीतर्फे लोकसभेच्या मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मागील १५ दिवसांपासून महायुतीतील लोकसभा उमेदवारीवरून गोंधळाची स्थिती आहे. विद्यमान खासदार भावना गवळी या महायुतीतर्फे मलाच उमेदवारी मिळणार असा दावा करीत होत्या. तर दुसरीकडे संजय राठोड यांच्यासह इतर नावावर महायुतीच्या वर्तुळात चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी दुपारी संजय राठोड हे माध्यमासमोर आले. महायुतीच्या वतीने गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. संजय राठोड हेच उमेदवार आहेत का अशी विचारणा केली असता याची घोषणा मुख्यमंत्री स्वत: करतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मंगळवारी रात्री संजय राठोड यांच्यासह भावना गवळी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईला तातडीने बोलाविले होते. पहाटे उशिरापर्यंत या विषयावर मुंबईत चर्चा झाल्यानंतर राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. संजय राठोड हे दारव्हा-दिग्रस मतदारसंघाचे विधानसभा सदस्य असून त्यांच्याकडे यवतमाळच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारीही होती. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यास या मतदारसंघात तिरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांनी तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुभाष पवार यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. देशमुख यांनी मंगळवारी आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. राठोड यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी उद्या गुरुवारच्या कार्यक्रमासाठीची तयारी यवतमाळमध्ये सुरू केली आहे.