शाळांमधील लोकसभा निवडणूकीचे मतदान केंद्र तंबाखुमुक्त असावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 04:11 PM2019-03-11T16:11:24+5:302019-03-11T16:11:44+5:30
वाशिम : महाराष्ट्र शासनाने सर्व शाळा आधीच तंबाखुमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र शासनाने सर्व शाळा आधीच तंबाखुमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणूक काळातही व्हावी, यासाठी शाळांमधील मतदान केंद्र तंबाखुमुक्त ठेवण्याकरिता शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन तंबाखु नियंत्रण समितीकडून करण्यात आले आहे. ‘सोशल मिडिया’तून याबाबत युद्धस्तरावर प्रचार-प्रसार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १० मार्चपासून सर्वत्र लागू झाली असून लवकरच प्रत्यक्ष निवडणूकही होणार आहे. तथापि, नियमानुसार सर्व ठिकाणचे मतदान केंद्र तंबाखुमुक्त असणे आवश्यक आहे. कुठल्यातरी शाळेतच असणाºया या मतदान केंद्रांवर ‘तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तसेच धूम्रपान क्षेत्र निषेध’ असे फलक लावण्यात यावे, मतदान केंद्राच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्री व साठवणूक करण्यास सक्त मनाई असल्याचा फलक व ‘तंबाखुमुक्त शाळा फलक’ लावावेत, मतदान केंद्रांवर शिक्षकांशिवाय इतरही प्रशासकीय विभागाचे कर्मचारी, निवडणूक अधिकारी काम करणार आहेत. त्यांना यामाध्यमातून तंबाखुपासून अलिप्त राहण्याची प्रेरणा मिळण्यासोबतच मतदारांमध्येही जनजागृती होणार आहे. यासाठी लोकसभा निवडणूकीपूर्वी शिक्षकांनी आपापल्या शाळांमध्ये तंबाखुमुक्त शाळा फलक, व्यसनमुक्तीची घोषवाक्ये, पोस्टर लावावी, असे आवाहन तंबाखु नियंत्रण समितीकडून केले जात आहे.