'लोकमत' वृत्ताची दखल : मांडवा, बोरखेडी गावात पोहचले पाण्याचे टँकर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 04:36 PM2019-05-17T16:36:28+5:302019-05-17T16:37:04+5:30
वृत्ताची दखल घेत तातडीने शुक्रवारी मांडवा आणि बोरखेडी येथे पाण्याचे टँकर पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : टँकर मंजूर असूनही काही गावात पोहचले नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १६ मे रोजी प्रकाशित केल्यानंतर, प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत तातडीने शुक्रवारी मांडवा आणि बोरखेडी येथे पाण्याचे टँकर पाठविण्यात आले.
यावर्षी रिसोड तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी रिसोड तालुक्यात पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे जलप्रकल्पांत पुरेशा प्रमाणात जलसाठा नव्हता. ११ पेक्षा अधिक जलप्रकल्प कोरडेठण्ण पडल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली आहे. पाणीपुरवठ्यासाठी टँकरची मागणी करणाºया करंजी गरड, मांडवा, बिबखेड व बोरखेडी अशा चार गावांत टँकर मंजूर आहेत. यापैकी करंजी गरड गावाचा अपवाद वगळता उर्वरीत गावात टँकर पोहचले नव्हते. वीजपुरवठा खंडीत असला तर करंजी गरड येथेही टँकर पोहचू शकत नाही. त्यामुळे करंजी गरड येथे टँकरच्या फेºया नियमित नसतात. गुरूवारी बिबखेडचा अपवाद वगळता बोरखेडी व मांडवा येथे टँकर पोहचले नव्हते. जलस्त्रोट आटले आणि पाण्याचे टँकरही नसल्याने गावकºयांचा घसा कोरडाच राहत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १७ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केले. याची दखल घेत १७ मे रोजी सकाळी मांडवा येथे टँकर पोहचले तर बोरखेडी येथे दुपारी टँकर पोहचले. शुक्रवार, १७ मे रोजी मांडवा आणि बोरखेडी या दोन्ही गावात टँकर पोहचले, अशी माहिती रिसोड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सहायक आर.एल. गरकळ यांनी दिली. पाणीटँकर नियमित सुरू राहावे, अशी अपेक्षा गावकºयांनी व्यक्त केली.