सततच्या पावसामुळे विहीर खचल्याने शेतकऱ्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:34+5:302021-07-26T04:37:34+5:30
उंबर्डा बाजार येथील शेतकरी अजित देशमुख यांची उंबर्डा बाजार शेतशिवारात शेत सर्व्हे नंबर १६४ मध्ये शेती आहे. या शेतात ...
उंबर्डा बाजार येथील शेतकरी अजित देशमुख यांची उंबर्डा बाजार शेतशिवारात शेत सर्व्हे नंबर १६४ मध्ये शेती आहे. या शेतात त्यांनी सिमेंट काॅंक्रिटने विहिरीचे पक्के बांधकाम केले होते. या विहीरीवर सौर ऊर्जेवर चालणारा मोटारपंपही कार्यान्वित होता. गत चार पाच दिवसांपासून पावसाने संततधार लावल्याने अजित देशमुख यांच्या शेतामधील विहीर खचली. विहिरीचा मलब्यासह लगतच असलेला मुरूम मातीचा ढिगाराही गेल्याने विहीर जमीनदोस्त झाली. या मलब्यात मोटार पंपही फसल्याने शेतकऱ्याचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकरी अजित देशमुख यांच्या खचलेल्या विहिरीचा तत्काळ पंचनामा करून आर्थिक भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात आली आहे.
--------
सततच्या पावसामुळे पिकांचेही नुकसान
गेल्या आठवडाभरापासून उंबर्डा बाजार परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे अजित देशमुख यांच्या शेतामधील विहीर खचलीच शिवाय परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही या नुकसानाची पाहणी प्रशासनाकडून करण्यात आली नाही.