बंधाऱ्याच्या अपूर्ण कामामुळे शेतीचे सात लाख रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:27 AM2021-06-23T04:27:01+5:302021-06-23T04:27:01+5:30
मंगरूळपीर : जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवल्याने पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमीन खरडून गेल्यामुळे सात लाख रुपयांचे नुकसान ...
मंगरूळपीर : जलसंधारण विभागाने बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवल्याने पावसाचे पाणी शेतात घुसून शेतजमीन खरडून गेल्यामुळे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार तालुक्यातील गणेशपूर येथील शेतकरी शंकर खोडके यांनी उपविभागीय अधिकारी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
गणेशपूर येथील गट नं. ४ / ३ मधील शेती क्षेत्र २ हे. ४० आर शेतजमीन अर्जदाराचे वहितीत व ताब्यात आहे. या जमिनीत मागील वर्षी एप्रिल - मे २०२१ मध्ये जल संधारण विभाग मंगरूळपीरमार्फत बांध करण्याचे काम सुरू आहे. हे काम संबंधित विभागाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून बंधारा व्यवस्थित केला नाही. बंधाऱ्यामध्ये आज रोजीसुद्धा भरपूर माती असून संपूर्ण शेतात गिट्टी, डस्ट पडलेली आहे. १० जून २०२१ रोजी रात्री व १२ जून २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे सदरहू बंधारा पूर्णपणे न बांधल्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी माझ्या शेतातून वाहिले आहे. त्यामुळे माझी संपूर्ण जमीन खरडून गेली असून पेरणीयोग्य राहिलेली नाही. त्यामुळे मला या वर्षीच्या पेरणीच्या हंगामात पेरणी करता येत नाही. माझे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून, त्यामुळे माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. आज रोजी शेतात पावसाच्या पाण्याने तळे साचलेले आहे. जल संधारण विभागाने पावसाळ्यापूर्वी बंधाऱ्याचे काम पूर्ण केले नाही व बंधाऱ्यामधील माती व गाळ व्यवस्थित उपसला नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता व्यवस्था केली नाही व बंधाऱ्याच्या बांधकामाकरिता आणलेली गिट्टी व डस्ट पावसाळ्यापूर्वी उचलून नेली नाही व ती शेतातच पडू दिली. दिनांक १० व १२ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातच पाणी साचून वाट मिळेल तिकडे फुटले व त्यामध्ये माझी संपूर्ण शेतजमीन खरडून गेली. ती जमीन पेरण्यायोग्य राहिलेली नाही व जल संधारण विभागाने बंधारा बांधकामासाठी आलेली गिट्टी व डस्ट आज रोजीसुद्धा शेतातच पडलेली आहे. माझ्या संपूर्ण शेतात तळे साचून पाणी साचले असल्यामुळे मी शेतात पेरणी करू शकत नाही. त्यामुळे माझे अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. याची आपल्या विभागामार्फत पाहणी व चौकशी करून माझ्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी; अन्यथा माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येईल व मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे तक्रारीत नमूद आहे.