Washim: वाशिममध्ये लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधात मोर्चा
By संतोष वानखडे | Published: December 25, 2022 06:11 PM2022-12-25T18:11:53+5:302022-12-25T18:12:22+5:30
Washim: २५ डिसेंबरला वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान भव्य मूकमोर्चा काढण्यात आला.
- संतोष वानखडे
वाशिम - लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी सकल हिंदू समाज, हिंदू धर्म रक्षा समितीच्यावतीने २५ डिसेंबरला वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान भव्य मूकमोर्चा काढण्यात आला.
स्थानिक शिवाजी महाराज चौक येथे भारत मातेची आरती करण्यात आली. त्यानंतर पाटणी चौकमार्गे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत निघालेल्या या भव्य मोर्चामध्ये आयोजक प्रा. दिलीप जोशी यांच्यासह संत, महंतांसह सकल हिंदू समाजबांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती. भगव्या टोप्या घातलेल्या आणि भगवे ध्वज घेतलेल्या महिला अग्रभागी होत्या. लव्ह जिहादविरोधी कायदा झालाच पाहिजे, धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. लव्ह जिहादच्या खोट्या प्रेमात, जाळ्यात ओढून हिंदू मुलींचे धर्मांतर केले जाते तर काही मुलींची क्रुरतेने हत्या करण्यात आली. पालकांनीदेखील यापासून सावध राहिला पाहिजे, याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचेही प्रा. जोशी म्हणाले. गोहत्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. हभप सागर महाराज पारिस्कर महाराज यांनी उद्बोधन केले आणि या मार्चाची सांगता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झाली. यावेळी संत गिरनारी महाराज, संत बालयोगी गोपाल महाराज, हभप नामदेव महाराज काकडे, हभप सागर महाराज पारिस्कर, हभप नितीन महाराज देशमुख, हभप पंकज महाराज देव, हभप अंबादास इंगोले महाराज यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
- लव्ह जिहादविरोधी कायदा बनवून यातील दोषींवर कठोर कारवाईची तरतूद करावी. ही प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष न्यायालय असावे.
- लव्ह जिहाद, धर्मांतर रोखण्यासाठी एक स्वतंत्र विभागाची स्थापना करावी. प्रलोभने, धमकावणे अथवा फसवणूक रोखावी.
- देशात गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात यावा.