प्रेम, लग्नाचे आमिष, अत्याचार अन् गर्भवती! अल्पवयीय मुलीचे शोषण : लग्नास नकार
By संतोष वानखडे | Published: March 1, 2023 07:11 PM2023-03-01T19:11:02+5:302023-03-01T19:11:16+5:30
तुझ्यावर माझे नितांत प्रेम आहे, आपण लग्न करू अशी बतावणी करत एका अल्पवयीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले.
वाशीम : तुझ्यावर माझे नितांत प्रेम आहे, आपण लग्न करू अशी बतावणी करत एका अल्पवयीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून पुढे ती गर्भवती राहिली आणि त्याने लग्नास नकार देत तिला घरी पाठवून दिले. अखेरिस त्या मुलीने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी १ मार्च रोजी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय महिलेने १ मार्च रोजी तक्रार दिली की, तिची १५ वर्षीय मुलगी ही मागील सहा महिन्यांपासुन आरोपी शेख राजिक शेख मोहमद रा.शेलुबाजार याच्यासोबत त्याचे घरी राहत होती. घरी परत ये असे मुलीला म्हटल्यानंतर तिने शेख राजिक व मी लग्न करणार असून, यामध्ये काही विघ्न आणल्यास जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे फिर्यादीने भीतीपोटी काही म्हटले नाही. परंतू, १५ फेब्रुवारीला फिर्यादीची अल्पवयीन मुलगी अचानक घरी परत आल्याचे पाहून तिला विचारणा केली. तिने आपबिती कथन करीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
शेख राजिकने लग्नास नकार देत आईकडे परत जा, असा दम भरला. आरोपीने लैंगिक शोषण केल्याने ती चार महिन्याची गर्भवती असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. समाजात बदनामी होईल या भितीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती. परंतु १ मार्चला मोठी हिम्मत करीत तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलीसांनी कलम ३७६, ३७६(२) एन भादंवी व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
आरोपीस अटक
लैंगिक शोषण केल्याची तक्रार प्राप्त होताच मंगरूळपीर पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवित आरोपीस तातडीने अटक केली. या घटनेचा पुढील तपास एपिआय मंजुषा मोरे करीत आहेत.