प्रेमीयुगुल पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: July 16, 2015 01:29 AM2015-07-16T01:29:23+5:302015-07-16T01:29:23+5:30
वाशिम रेल्वे स्थानक परिसरातील घटना.
वाशिम : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटा येथील प्रेमीयुगुलाला वाशिम पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या देवाळा मार्गावर मोठय़ा शिताफीने पकडले. ही घटना १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटा येथील एका अल्पवयीन मुलीशी गावातीलच शंकर सदाशिव दाभाडे या मुलाचे सूत जुळाले. या दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत १७ जुलै रोजी पहाटे ५ वाजताचे सुमारास गावामधून मोटरसायकलने पलायन केले. आपली मुलगी घरून निघून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुलीच्या नातेवाइकांनी शिरपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली. पोलिसांनी कसलाही विलंब न लावता प्रेमीयुगुलाचा मोबाइल लोकेशनवरून शोध घेतला. मोबाइल लोकेशनद्वारे प्रेमीयुगुल वाशिम शहर परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी संग्राम सांगळे व ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात डिटेक्शन ब्रँचचे सहायक पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर, रमेश जायभाये, सुनील पवार, राजेश बायस्कर, मंगेश नरवाडे व गौरव भांबे यांच्या पथकाने सकाळी ११ पासून रेल्वे स्थानक परिसर पिंजून काढला. अखेर सायंकाळी ५ वाजता सदर प्रेमीयुगुल देवाळा रोडकडे जाताना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांना शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याजवळ असलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.