वाशिम जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 04:51 PM2019-02-04T16:51:09+5:302019-02-04T16:54:55+5:30
वाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: हिवाळा अद्याप संपला नसतानाच जिल्ह्यातील २५ प्रकल्पांनी तळ गाठला असून, ११ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, तर उर्वरित प्रकल्पांची स्थितीही गंभीर होत आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांवर आधारीत भागांत पाणीटंचाईचे सावट दाट झाल्याचे दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यात ३ मध्यम आणि १३१ लघू पाटबंधारे व बॅरेजेस मिळून एकूण १३४ प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांत मिळून सद्यस्थितीत ३४ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उरला आहे, त्यातील तीनपैकी दोन मध्यम प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. उर्वरित १३१ प्रकल्पांचा विचार करता ३० टक्क्यांहून कमी उपयुक्त साठा उरला असून, यातील बहुतांश प्रकल्पांवर सिंचन आणि पाणी पुरवठा योजनाही राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील रब्बी क्षेत्र यंदा वाढल्याने सिंचनासाठी पाण्याचा उपसाही वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाही पाणीटंचाईची समस्या जाणवणार असल्याचे दिसत आहे. सद्यस्थितीत वाशिम तालुक्यातील ९, रिसोड तालुक्यातील ८, मंगरुळपीर तालुक्यातील ३, तर मालेगाव, मानोरा आणि कारंजा तालुक्यातील प्रत्येकी दोन प्रकल्पांनी तळ गाठला आहे. यातील बहुतांश प्रकल्प सिंचनासाठी असल्याने शेतकºयांना सिंचनात अडचणी निर्माण झाल्या आहेत, तर पाणी पुरवठा योजना राबविण्यात येणाºया प्रकल्पांची स्थिती गंभीर होत असल्याने जिल्हावासियांना प्रामुख्याने ग्रामीण भागांतील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.