जुलैमध्ये सर्वात निचांकी रुग्ण; निर्बंधातून सुट केव्हा मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:28+5:302021-08-02T04:15:28+5:30
संतोष वानखडे वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, जुलै महिन्यात दैनंदिन सरासरी ८ रुग्ण आढळून आले. मात्र, जिल्ह्यात ...
संतोष वानखडे
वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून, जुलै महिन्यात दैनंदिन सरासरी ८ रुग्ण आढळून आले. मात्र, जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू असल्याने या निर्बंधामधून सूट केव्हा मिळणार, याकडे व्यापाऱ्यांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
देशात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८,९३४ होती. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारावर रुग्ण आढळून आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत आहे. जुलै महिन्यात तर निचांकी संख्येत रुग्ण आढळून आले. ३१ दिवसांत २४६ अर्थात दैनंदिन सरासरी ८ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू असल्याने सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे तर शनिवार व रविवार अशा दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित दुकाने सुरू ठेवण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अर्थचक्र प्रभावित झाले होते. दुसरी लाट ओसरल्याने अर्थचक्राला गती आणि उद्योग क्षेत्राला उभारी म्हणून निर्बंधातून सूट मिळावी असा सूर व्यापारी क्षेत्रातून उमटत आहे.
०००००००००००००
असे आढळले कोरोना रुग्ण
१ एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ - ८९३४
महिना एकूण दैनंदिन सरासरी
मार्च ८०२७ २६७
एप्रिल १०४९९ ३४९
मे १२६०३ ४२०
जून १३५१ ४५
जुलै २४६ ८
०००००००००००
बॉक्स
कोरोनाविषयक त्रिसूत्रींचे पालन आवश्यकच!
लसीकरण, स्वयंशिस्त आणि सर्वांची खबरदारी हाच कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रभावी उपाय ठरू शकतो. तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत असल्याने, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि हात वारंवार स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे.