जुन्या ‘पीएचची’ची भव्यदिव्य जागा पडीक अन् ग्रामीण रुग्णालयाला जागा अपुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:41 AM2021-09-19T04:41:29+5:302021-09-19T04:41:29+5:30
माणिक डेरे मानोरा : एकीकडे मानोरा येथील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राची (पीएचसी) भव्यदिव्य जागा पडीक पडली आहे. तर दुसरीकडे ...
माणिक डेरे
मानोरा : एकीकडे मानोरा येथील जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राची (पीएचसी) भव्यदिव्य जागा पडीक पडली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालय अपुऱ्या जागेत कसेतरी सुरू आहे. येथे रस्तेही नादुरुस्त असल्याने आणि फारशा भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय होत आहे. दरम्यान, जुन्या पीएचसीची इमारत निर्लेखित करून तेथे नव्याने उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयाची इमारत साकारण्यात यावी, असा सूर तालुकावासीयांमधून उमटत आहे.
मानोरा शहरात एक ग्रामीण रुग्णालय आणि तालुक्यातील कुपटा, शेंदुरजना (अढ़ाव),पोहरादेवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. काही ठिकाणी उपकेंद्र आहेत. कोरोना काळात व आता विषम हवामानामुळे मोठ्या प्रमाणात हिवताप, मलेरिया, सर्दी, तापचे रुग्ण आहेत. सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. सरकारी दवाखान्यात पुरेसा औषधीसाठा नसल्याणे, तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याने रुग्णाचे हाल होत आहेत. सध्या असलेली ग्रामीण रुग्णालयाची इमारत तोकडी आहे. येथे सुविधा नाहीत. म्हणून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पडीक इमारतीचे निर्लेखन करून तेथे नवीन उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्ह्यावे, अशी तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे.
००००
जागा हस्तांतरण रखडले
पीएचसीची ही जागा जिल्हा परिषदेची आहे. ग्रामीण रुग्णालय राज्य शासनाचे आहे, म्हणून ही जागा जिल्हा परिषदने ग्रामीण रुग्णालयाला हस्तांतरण करणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु, अद्याप हा प्रस्ताव लालफितशाहीत अडकलेला आहे.
...................
रस्ता नादुरुस्त
ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता नादुरुस्त आहे. आजारी वृद्ध, गरोदर माता यांना या ररस्त्यावरून धड चालताही येत नाही. रस्ता दुरुस्त केव्हा होणार? याकडे रुग्णांसह नातेवाइकांचे लक्ष लागून आहे
.....................
कोट
उपलब्ध मनुष्यबळ आणि भौतिक सुविधेनुसार रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न केला. पीएचसीच्या जुन्या इमारतीचे निर्लेखन करून ग्रामीण रुग्णालयास ही जागा हस्तांतरण करणे किंवा नवीन इमारत बांधने हा विषय शासनस्तरावरील आहे.
- डॉ. वैभव खडसे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, मानोरा.
..................
कोट
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना मानोरा ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीबाबत व भौतिक सुविधांबाबत निवेदन दिले. त्यांनी संबंधितांशी पत्रव्यवहार केला. परंतू, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.
- शाम पवार, तालुका अध्यक्ष, प्रहार