शिष्यवृत्तीची ’महा-ई-स्कॉल’ संगणक प्रणाली होणार बंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:27 PM2018-09-08T15:27:10+5:302018-09-08T15:28:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सन २०१७-१८ या शैक्षणिक वषार्पासून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने विकसित केलेल्या महा-डीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क प्रदान करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, यापूर्वी राबविण्यात येणारी ’महा-ई-स्कॉल’ ही जूनी संगणक प्रणाली लवकरच बंद केली जाणार आहे. त्याअनुषंगाने ‘महा-ई-स्कॉल’या संगणक प्रणालीवर प्रलंबित असलेले शिष्यवृत्ती व शिक्षण, परीक्षा शुल्कासंबंधीचे सर्व अर्ज तातडीने समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयाकडे आॅनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदान करण्यासाठी ‘महा-डीबीटी’ नामक नवीन पोर्टल विकसित केले आहे. त्यामुळे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रदान करण्यासाठी राबविण्यात येत असलेली ‘महा-ई-स्कॉल’ ही जुनी संगणक प्रणाली येत्या काही दिवसात बंद होणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली.
‘महा-ई-स्कॉल’ या संगणक प्रणालीवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क संबंधीचे काही अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. सर्व प्रलंबित अर्ज तातडीने समाजकल्याण कार्यालयाकडे आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे तसेच त्या संबंधीचे ‘बी-स्टेटमेंट’, विद्यार्थ्यांचे अर्ज सर्व कागदपत्र व प्राचार्यांच्या स्वाक्षरीसह समाजकल्याण विभागाकडे सादर करावी लागणार आहेत. अपूर्ण कागदपत्रांसह प्राप्त होणारे प्रस्ताव, कागदपत्रांअभावी प्रलंबित असलेले प्रस्ताव मंजूर न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहील, असा इशारा माया केदार यांनी दिला. नवीन महा-डीबीटी सन २०१८-१९ या शैक्षणिक वषार्पासून सुरू झाल्यानंतर कोणतेही जूने अर्ज प्रलंबित राहिल्यास त्यासाठी संबंधित संस्था, महाविद्यालय जबाबदार राहील, असे समाजकल्याण विभागाने स्पष्ट केले.