वेतन आयोगासाठी महाबीज कर्मचारी संपावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:44 PM2020-12-09T16:44:06+5:302020-12-09T16:46:10+5:30
Mahabeej News कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ९ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.
वाशिम : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळातील (महाबीज) अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटनेने ९ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे बिजोत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे .
महाबीजच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत महामंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. यासंदर्भात ५ डिसेंबर रोजी महामंडळाच्या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयावरही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव महाबीज अधिकारी, कर्मचारी संघटनेकडून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. याबाबत महाबीजच्या महाव्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले असून, सातवा वेतन आयोग हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासह इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला.
या संपामुळे ऐन बिजोत्पादनाच्या हंगामात बिजोत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. बिजोत्पादनसाठी शेतमाल मोजून घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. परंतू संप सुरू असल्याने ही प्रक्रिया ठप्प आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.