महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथे भाविकांची मांदियाळी, १९६ क्विंटल महाप्रसादाची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 12:18 PM2018-02-13T12:18:24+5:302018-02-13T12:18:42+5:30
महाशिवरात्रीनिमित्त जानगीर महाराज संस्थानमध्ये सिद्धेश्वर महादेव, जानगीर महाराज, शिवगीर महाराज व ओंकारगीर महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. बु
शिरपूर जैन (वाशिम) - महाशिवरात्रीनिमित्त जानगीर महाराज संस्थानमध्ये सिद्धेश्वर महादेव, जानगीर महाराज, शिवगीर महाराज व ओंकारगीर महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. बुधवारी (14 फेब्रुवारी) होणा-या १९६ क्विंटलच्या महाप्रसादाचीही जय्यत तयारी करण्यात आली असून संस्थान व पोलीस प्रशासन यासाठी सज्ज झाले आहे.
दरवर्षी येथील जानगीर महाराज संस्थानमध्ये महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. त्यानुसार ७ फेब्रुवारीपासून संस्थानमध्ये श्रीमद भागवत कथा निरूपन कार्यक्रमासह भजन, किर्तन यासह विविध कार्यक्रम सतत सुरू आहेत. १३ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त संस्थानमध्ये परिसरातील भाविक हजारांच्या संख्येत सिद्धेश्वर महादेव, जानगीर महाराज, ओंकारगीर महाराज यांच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. यानिमित्ताने बुधवारी १२१ क्विंटल गव्हाच्या पोळ्या आणि ७५ क्विंटल वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद तयार करण्यात येणार आहे. ७० ते ७५ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंपरेनुसार महाप्रसादाचा नैवैद्य मुस्लीम संत हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्ग्याला अर्पण केल्यानंतरच महाप्रसाद वितरित करण्यात येईल.