महालक्ष्मी उत्सवावर कोरोनाचे सावट; ‘मखर’च्या मागणीत घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:23 AM2020-08-23T11:23:36+5:302020-08-23T11:26:10+5:30
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ‘मखर’च्या मागणीत ५० टक्के घट असल्याचा दावा विक्रेत्यांना केला.
- निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : यावर्षी महालक्ष्मी उत्सवावरही कोरोनाचे सावट असून, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ‘मखर’च्या मागणीत ५० टक्के घट असल्याचा दावा विक्रेत्यांना केला. दुसरीकडे कच्चा माल, वाहतुकीच्या खर्चात वाढ झाल्याने मखरच्या किंमतीत वाढ झाली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात ३१ आॅगस्टपर्यंत लॉकडाऊन आहे. सद्यस्थितीत प्रत्येक सण, उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याचे दिसून येते. तीन दिवसांवर महालक्ष्मी सण येऊन ठेपला आहे. महालक्ष्मी बसविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुंमध्ये सर्वात महत्त्वाचे मखर असते. यावर्षी मखरची मागणी ५० टक्क्यांनी घटल्याचा दावा कारागिरांनी केला. यामुळे मखर बनवणारे कारागीर आर्थिक संकटात सापडले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत कच्च्या मालाच्या भावामध्ये वाढ झाली. वाहतूक खर्चही वाढला. यामुळे मखरच्या किंमतीतही वाढ झाली. तयार मखरच्या किंमती (पाच फुट) २०१९ मध्ये पाच हजाराच्या आसपास होत्या. यावर्षी सहा हजार रुपये दर झाले.
साडेचार फुट मखरच्या किंमती गतवर्षी साडेचार हजाराच्या आसपास होत्या. यावर्षी यामध्ये एका हजाराने वाढ झाली. पायरीची किंमती गेल्यावर्षी ९०० रुपयाच्या आसपास होती. यावर्षी १२०० ते १३०० रुपयादरम्यान किंमत असल्याचे कारागिरांनी सांगितले.
मंदीचे सावट
दरवर्षी महालक्ष्मीनिमित्त आतापर्यंत मोठ्या संख्येने आॅर्डर असतात. मखर व अन्य वस्तू ग्राहक हे घेऊन जात असत. यावर्षी तशी परिस्थिती नाही. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती व कोरोनामुळे यावर्षी व्यवसायावर मंदी आहे, असे रफीक शहा, सतीश खडसे या कारागिरांनी सांगितले.