केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच होणार महाराष्ट्र दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 12:42 PM2020-04-25T12:42:15+5:302020-04-25T12:42:24+5:30
राज्यात १ मे रोजी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे राज्य शासनाच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी राज्यात १ मे रोजी महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे राज्य शासनाच्या परिपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. त्यातील निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयातील केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातच महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे आणि यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून बॅण्डची व्यवस्था करण्याचे किंवा शक्य न झाल्यास अधिकाºयांनीच राष्ट्रगिताचे गायन करण्याचे निर्देश २२ एप्रिल रोजी देण्यात आले आहेत.
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यासाठीच लॉकडाऊन आणि संचारबंदीही लागू करण्यात आली असून, जनतेला सोशल डिस्टन्सिंगचे कठोर पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्याशिवाय सर्व धार्मिक, राजकीय मेळावे, यात्रोत्सवासह सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. अशात शासकीय दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करणेही अयोग्य ठरू शकते. हे लक्षात घेऊनच राज्यशासनाने १ मे रोजी साजरा केला जाणारा महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश १५ एप्रिलच्या परिपत्रकानुसार दिले होते. आता २२ एप्रिल रोजी या संदर्भात आणखी एक परिपत्रक जारी करताना १५ एप्रिलच्या परिपत्रकातील सुचनेनुसारच राज्यातील केवळ जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालयातच महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात पोलीस विभागाशी समन्वय साधून पोलीस बॅण्ड उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे आणि बॅण्ड उपलब्ध नसल्यास कार्यक्रमात उपस्थित अधिकाºयांनीच राष्ट्रगिताचे गायन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.