Maharashtra Election 2019 : दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 02:10 PM2019-10-06T14:10:38+5:302019-10-06T14:10:48+5:30

अर्ज छानणीनंतर आता ६० उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत.

Maharashtra Election 2019: Veteran's reputation diminishes! | Maharashtra Election 2019 : दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला!

Maharashtra Election 2019 : दिग्गजांची प्रतिष्ठा लागली पणाला!

googlenewsNext

- सुनील काकडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत पाच वर्षांत दमदार तयारी करूनही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज इच्छुकांना भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवारी नाकारून विद्यमान आमदारांनाच पुन्हा ती बहाल केली. यामुळे तीनही मतदारसंघात बंडखोरीला उधाण आले असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष, शिपींग कॉर्पोरेशनचे संचालक, माजी खासदार, माजी आमदार आदिंचा समावेश आहे. दरम्यान, ही मंडळी शेवटपर्यंत निवडणूक रिंगणात राहते की पक्षादेशापुढे झुकत माघार घेते, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.
४ आॅक्टोबर या नामांकन दाखल करण्याच्या अंतीम मुदतीनंतर तीनही मतदारसंघात तब्बल ६३ जण; तर अर्ज छानणीनंतर आता ६० उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. वाशिम मतदारसंघात भाजपाकडून लखन मलिक, काँग्रेसकडून रजनी राठोड, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्यासह अन्य २३ उमेदवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे गतवेळचे उमेदवार नीलेश पेंढारकर यांनी यंदा अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपासमोर आव्हान उभे केले; तर राजकारणात नव्याने ‘एन्ट्री’ केलेल्या ‘वंचित’च्या डॉ. देवळेंचा काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून प्रामुख्याने मलिक, पेंढारकर, डॉ. देवळे आणि राठोड अशी चौरंगी लढत होईल, असे बोलले जात आहे.
कारंजा-मानोरा मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी विविध स्वरूपातील विकासात्मक कामे मार्गी लावली. त्याचा त्यांना निश्चितपणे मोठा फायदा होणार आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपा सोडून पुन्हा राष्ट्रवादीत गेलेले प्रकाश डहाके हे पाटणींच्या झंझावाताला कशाप्रकारे रोखतील, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
प्रकाश डहाकेंच्या उमेदवारीमुळे एक पाऊल मागे घेत अपक्ष उमेदवारी दाखल केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे शेवटपर्यंत रिंगणात राहतात की पक्षादेशापुढे नमते घेऊन माघार घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदारसंघात ‘वंचित’कडून डॉ. राम चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली; पण ते दिग्गजांपुढे विशेष करिश्मा दाखवू शकणार नाहीत, अशी चर्चा होत आहे. यासह ‘वंचित’मधून उमेदवारीचा विचार न झाल्याने अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या युसूफ पुंजाणी यांनाही मातब्बरांच्या आव्हानाला तोंड देताना यावेळी बरीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी या मतदारसंघात प्रामुख्याने पाटणी विरूद्ध डहाके अशीच लढत होईल, असा राजकीय जाणकारांचा कयास आहे.
रिसोड मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमीत झनक यांना चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जाऊन विश्वनाथ सानप यांना उमेदवारी मिळाली. यामुळे मात्र दुखावलेले माजी आमदार तथा शिपींग कॉर्पोरेशनचे विद्यमान संचालक विजयराव जाधव यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. याशिवाय हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जात असल्याने आधीच पक्षाला अलविदा केलेल्या दिलीप जाधव यांनी ‘वंचित’कडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सद्यातरी या मतदारसंघात पंचरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, या प्रमुख पाच उमेदवारांमधून कुणीही पराभूत झाल्यास त्यांच्या अनेक वर्षांच्या यशस्वी राजकीय प्रवासाला मोठा डाग लागणार असून पक्षातूनही हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा धोका पत्करून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे शेवटपर्यंत निवडणूक रिंगणात राहतात की माघार घेतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
‘झेंडा’ बदलणाऱ्यांची राजकीय कारकिर्द सापडू शकते धोक्यात!
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत उमेदवारी मिळण्याची अपेक्षा ठेऊन राजकीय क्षेत्रातील काही दिग्गज मंडळीनी पक्षादेशाप्रमाणे संघटन मजबूतीसाठी प्रयत्न केले; मात्र उमेदवारी न मिळाल्याने कालपर्यंत भगवा झेंडा खांद्यावर असणाऱ्यांनी घड्याळाच्या काट्याप्रमाणे पुढे सरकून भूमिका बदलली. काहींनी स्वत:च्या बळावर अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर आव्हान उभे केले. ही बंडखोर मंडळी निवडणूकीत यशस्वी ठरली तर ठीक; अन्यथा आमदारकीच्या लालसेपायी ऐनवेळी ‘झेंडा’ बदलणाºयांची राजकीय कारकिर्द धोक्यात सापडू शकते, अशी चर्चा होत आहे.
नवख्या उमेदवारांना करावी लागणार बरीच मेहनत
वाशिम मतदारसंघातून ‘वंचित’कडून डॉ. सिद्धार्थ देवळे, काँग्रेसकडून रजनी राठोड हे दोन उमेदवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, वाशिम मतदारसंघाचे विद्यमान आमदार लखन मलिक यांच्या तुलनेत नमूद दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित, सुशिक्षित समजले जात असले तरी मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत वावरणाºया सर्वसामान्य मतदारांशी त्यांचा अद्यापपर्यंत संबंध आलेला नाही आणि आता निवडणूकीला अवघे १५ दिवस उरल्याने ते यासंदर्भात विशेष काही करूही शकणार नाहीत, असे राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे मात्र प्रथमच निवडणूकीला सामोरे जात असलेल्या या नवख्या उमेदवारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Veteran's reputation diminishes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.