Maharashtra Election 2019 : २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 06:04 PM2019-10-22T18:04:19+5:302019-10-22T18:05:03+5:30
अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हयातील काही मतदारसंघामधील मतदानामध्ये घट आल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.
- नंदकिशोर नारे
वाशिम: २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदान व २१ आॅक्टोबर २०१९ रोजी झालेले मतदानाच्या टक्केवारी पाहता पश्चिम वºहाडातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हयातील काही मतदारसंघामधील मतदानामध्ये घट आल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. यामध्ये वाशिम जिल्हयातील तीन पैकी एक, बुलडाणा जिल्हयातील ७ मतदारसंघापैकी ५ तर अकोला विधानसभा मतदारसंघातील ५ पैकी २ मतदारसंघातील निवडणुकीतील मतदान घटले आहे.
पश्चिम वºहाडातील अकोला जिल्हयात एकूण ५ मतदारसंघाचा समावेश आहे. यामधील बाळापूर, अकोला पूर्व व मुर्तिजापूर वगळता अकोट मतदारसंघ व अकोला पश्चिम मतदारसंघाच्या निवडणुकीत घट दिसून येत आहे. अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीत ६०.८१ टक्के मतदान झाले होते . २०१९ च्या निवडणुकीत ६०.५० टक्के मतदान झाल्याने या मतदारसंघात ०.३१ टक्के मतदानात घट झाली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघामध्ये गत निवडणुकीत ५१.६२ टक्के मतदान झाले होते परंतु यावेळी ५०.२० टक्के मतदान झाल्याने यामध्ये १.४२ टक्के घट दिसून येत आहे.
बुलडाणा जिल्हयातील ७ विधानसभा मतदारसंघापैकी तब्बल ५ मतदारसंघामधील मतदानाच्या टक्केवारीत घट दिसून येत आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघात गत निवडणुकीत ६६.३६ टक्के तर यावर्षीच्या निवडणुकीत ६५.२० टक्के मतदान झाले. या मतदारसंघात १.१६ टक्के मतदान घटले. बुलडाणा मतदारसंघामध्ये गत निवडणुकीत ५९.७९ टक्के तर यावेळच्या निवडणुकीत ५८.२० टक्के मतदान झाल्याने या मतदारसंघात १.५९ मतदान घटले. चिखली मतदारसंघात गतनिवडणुकीत ६७.६६ टक्के तर यावेळीच्या निवडणुकीत ६४.६२ टक्के मतदान होवून गत निवडणुकीच्या तुलनेत ३.०४ टक्के मतदानात घट झाली आहे. सिंदखेड राजा मतदारसंघात गत निवडणुकीत ६४.६७ टक्के तर यावेळीच्या निवडणुकीत ६३.८७ टक्के मतदान होवून या मतदारसंघामध्ये ०.८ टक्के मतदान घटले. खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये गत निवडणुकीत ७३.८६ टक्के तर यावेळी ७०.१० टक्के मतदान झाले असून या मतदारसंघामध्ये ३.७६ टक्के मतदान घटल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरुन दिसून येते. बुलढाणा जिल्हयातील मेहकर व जळगाव जामोद मतदारसंघामधील निवडणुकीत घट झालेली दिसून येत नसली तरी फार मोठी अशी वाढ सुध्दा दिसून येत नाही.
वाशिम जिल्हयातील तीन विधानसभा मतदारसंघातील केवळ कारंजा या मतदारसंघात २.१७ टक्के मतदान गत निवडणुकीच्या तुलनेत कमी झालेले दिसून येत आहे. कारंजा मतदारसंघामध्ये गत निवडणुकीत ६३.२४ तर यावेळीच्या निवडणुकीत ६१.०७ टक्के मतदान झाले. रिसोड व वाशिम विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र अनुक्रमे १.०६ व १.८३ टक्के मतदानात वाढ दिसून येत आहे.