महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे, मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन
By नंदकिशोर नारे | Published: March 4, 2024 06:09 PM2024-03-04T18:09:18+5:302024-03-04T18:09:38+5:30
"शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शेतकरी हा आपला मायबाप आहे."
वाशिम : महाराष्ट्र स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे लोक आपल्या महाराष्ट्राला पसंत करू लागले असून, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम येथील क्रीडा संकुलात सोमवारी केले. ते महिला मेळाव्याला संबाेधित करताना बोलत होते. महिला बचत गटाच्या सदस्यांना संबाेधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आम्ही राज्यकारभार करीत आहोत. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करीत आहोत.
शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शेतकरी हा आपला मायबाप आहे. त्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही. तो अडचणीत असतो. त्यामुळे सरकार त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याशिवाय आपले राज्य परदेश गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. आपले राज्य ‘जीडीपी’मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र स्वच्छतेत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे लोक आपल्या महाराष्ट्राला पसंत करू लागले आहेत. युवकांना रोजगार मिळावा म्हणून बंद असलेल्या ७५ हजार नोकऱ्या सुरू केल्या असून, आता त्या जवळपास १ लाख ६० हजारांपर्यंत पोहाेचल्या आहेत. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून महाराष्ट्राचा लौकिक
आपण पहिल्यांदा स्वित्झर्लंडमधील दावोसला गेलो. त्यावेळी१ लाख ३७ हजार कोटींचे करारनामे केले. आता यावेळी गेलो तेव्हा ३ लाख ७३ हजार कोटींचे करारनामे केले. त्यामुळे जवळपास ३ ते ४ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसलाच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये गेलो होतो. तेव्हा महाराष्ट्रात येण्यासाठी खूप उद्याेजक आग्रही होते. आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून महाराष्ट्राचा लौकिक होत असल्याचेही ते म्हणाले.
महिलांना ५० हजार पिंक रिक्षा देणार
राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात महिला बालविकास विभागासाठी ४ हजार कोटींची तरतूद केली आहे. महिला विकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील महिलांना ५० हजार पिंक रिक्षा देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे ब्रँडिंग, त्याचे मार्केटिंग आणि त्याच्या विक्रीसाठीही संधी उपलब्ध करून द्यायची हा निर्णय देखील आम्ही घेणार आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.