मान्सूनपुर्व कामांबाबत महावितरणची दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:50 PM2019-06-07T16:50:11+5:302019-06-07T16:50:29+5:30

पावसाळा तोंडावर आला असतानाही या कामांबाबत महावितरण गंभीर नसून, अद्याप यातील बहुतांश कामांना सुरुवातच झाली नसल्याचे वास्तव आहे.

Mahavitaran's delayed maintanance work before monsoon! | मान्सूनपुर्व कामांबाबत महावितरणची दिरंगाई!

मान्सूनपुर्व कामांबाबत महावितरणची दिरंगाई!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. कधीकधी दिवसभर हा वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नाही. यामुळेच मान्सून पूर्व (प्री-मान्सून) विस्कळीत झालेल्या वीज तारा, वीज खांबासह इतर प्रकारची दुरुस्ती करण्याचे नियोजन महावितरणच्यावतीने करण्यात येते. यंदाही हे नियोजन केले आहे; परंतु पावसाळा तोंडावर आला असतानाही या कामांबाबत महावितरण गंभीर नसून, अद्याप यातील बहुतांश कामांना सुरुवातच झाली नसल्याचे वास्तव आहे.
पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, आॅईल फिल्टरेशन, उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्युज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, वीज तारांजवळील झाडांच्या फांद्याची छाटणी, भूमिगत वीजवाहिनी टाकणे, जुन्या फिडर पिलरमध्ये ‘इन्सूलेशन स्प्रे’ मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाºया परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. महावितरण वाशिम अंतर्गत या कामांचे शेड््यूल तयार असून, पावसाळा तोंडावर आला आहे. या कामांचे कंत्राट विभागीयस्तरावरून निविदा काढण्यात येतात. तथापि, जिल्ह्यात अद्यापही बहुतांश ठिकाणी कामांना प्रारंभ झालेला नाही. संभाव्य अपघाताची भिती लक्षात घेता. महावितरणच्यावतीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांना वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे.
कामांची निविदा प्रक्रिया संथगतीने
वाशिम जिल्ह्यात पावसाळ्याच्या पृष्ठभुमीवर महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे नियोजन आणि अहवाल तयार आहे. आता या कामांची निविदा प्रक्रिया विभागीय स्तरावरून करण्यात येते. तथापि, पावसाळा तोंडावर आला असताना बहुतांश कामांची निविदा प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. अनेक प्रस्ताव अद्याप वाशिम येथील महावितरणच्या कायालयात सादर करण्यात आले असतानाही निविदा प्रक्रियेचे काम संथगतीने सुरू आहे. निविदा प्रक्रियाच संथ असल्याने कामे कधी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वीजखांब कोसळल्याने ६ गावांचा वीज पुरवठा खंडीत
महावितरणच्यावतीने मान्सून पूर्व देखभाल दुरुस्तीच्या कामांबाबत गांभिर्य घेण्यात आले नाही. त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील शिवणी रोड गाव परिसरात सोमवार ४ जूनच्या रात्री आलेल्या वादळी वाºयामुळे ८ ते १० वीज खांब कोसळून ६ गावांतील तब्बल दोन दिवस वीज पुरवठा खंडीत झाला. यातील काही गावांचा वीज पुरवठा गुरुवार ६ जूनपर्यंतही सुरळीत होऊ शकला नाही. त्याशिवाय मान्सूनपूर्व पावसामुळे कारंजा शहरातही झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. यातही झाडांवरील वीज तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला सुदैवाने यामुळे कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.

मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे जिल्ह्यातील अत्यावश्यक भागांत प्राधान्याने करण्यात येत आहेत. कंत्राटदार कंपन्यांना या संदर्भात गांभिर्य बाळगण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत ही कामे पूर्ण होणार आहेत.
- आर.जे. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: Mahavitaran's delayed maintanance work before monsoon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.