उपवर मुलांना गंडविणाऱ्या टोळीची मुख्य सूत्रधार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 10:40 AM2021-04-01T10:40:20+5:302021-04-01T10:40:27+5:30
Crime News सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम पसार करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीची मुख्य सूत्रधार महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.
- धनंजय कपाले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अलीकडच्या काळात काही ठराविक समाजात लग्नासाठी वधू मिळणे कठीण झाले आहे. नेमक्या याच परिस्थितीचा गैरफायदा घेत उपवर मुलांना फसवून त्यांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम पसार करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीची मुख्य सूत्रधार महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. आशा विलास खडसे (रा. रेल्वे स्टेशन परिसर, वाशिम) असे महिलेचे नाव आहे.
पैसे घेऊन लग्न लावण्याची बतावणी करत फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रत्येक जिल्ह्यात सुळसुळाट आहे. यासंबंधीची माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय अहिरे यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार अहिरे यांनी बनावट उपवराच्या माध्यमातून टोळीशी संपर्क साधला. त्यांना लग्नासाठी मुलगी हवी आहे, अशी बतावणी करून देवगाव फाटा (जि. औरंगाबाद) येथील हॉटेल पद्मावतीजवळ लग्नाच्या बोलणीकरिता २६ मार्च रोजी दुपारी २ वाजता बोलावण्यात आले. यावेळी टोळीला पकडण्यासाठी हॉटेल पद्मावतीच्या बाहेर साध्या वेशात पोलिसांनी सापळा रचला. बोलणीप्रमाणे हॉटेल पद्मावतीसमोर एम.एच. १५ ई.ई. ०२५६ या वाहनातून तीन महिला व एक पुरुष असे हॉटेल पद्मावतीसमोर उतरून उभे राहिले. खबऱ्याने साध्या वेशातील पोलिसांना टोळीबाबत इशारा देताच पोलिसांनी या सर्व व्यक्तींवर एकदम झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
या टोळीची सखोल चौकशी केली असता टोळीची मुख्य सूत्रधार आशा विलास खडसे (रा. रेल्वे स्टेशन, वाशिम) ही महिला असल्याचे निष्पन्न झाले. तिच्यासोबत लग्नाकरिता आलेली मुलगी नामे कल्पना सुधाकर पाटील (रा. कासगाव, मुंबई) त्यांचे सोबती, सविता चंद्रकला कुलकर्णी (रा. नाशिक) व नीलेश दिलीप पाटील (रा. नाशिक) असे लोक आढळून आले. या टोळीतील आरोपींकडून सात मोबाईल फोन, सात बनावट आधार कार्डसह एक इंडिका कार असा एकूण ४ लाख ५५ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
मोबाइलने उलगडले बनावट विवाहाचे रहस्य
या टोळीतील मुख्य आरोपी असलेली वाशिम येथील आशा खडसे हिची सखोल चौकशी केली असता, तिच्या मोबाईलमध्ये एकाच महिलेचे अनेकांशी विवाह केल्याचे फोटो आढळून आले. ही टोळी प्रामुख्याने एजंटच्या माध्यमातून लग्नास इच्छुक मुलांची माहिती घेऊन त्यांना हेरते व बोलणी करून मुलीचे आई, वडील, मावशी बनून लवकरात लवकर लग्न करायचे सांगतात.