उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखा- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायम मिश्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:44 PM2018-09-04T12:44:28+5:302018-09-04T12:45:13+5:30
वाशिम : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून २० सप्टेंबर रोजी मोहरम आहे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनतेनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले.
वाशिम : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून २० सप्टेंबर रोजी मोहरम आहे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनतेनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. गणेशोत्सव व मोहरमच्या पृष्ठभूमीवर ३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मिश्रा पुढे म्हणाले की, गणेशोत्सव व मोहरम हे दोन्ही धार्मिक सण शांततेत साजरे करून त्यांचे पावित्र्य अबाधित राखावे. गणेशोत्सव काळात समाजप्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करावे. तसेच डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले खड्डे संबंधित नगरपरिषद व ग्रामपंचायतींनी तातडीने भरून घ्यावेत. तसेच या मार्गावर व विसर्जन स्थळी विद्युत दिवे बसवून पुरेशी विद्युत व्यवस्था करावी. वाशिम व इतर शहरांमध्ये विसर्जन स्थळी अग्निशमन दल व आरोग्य पथक तैनात करण्यात यावे.
नगर परिषद क्षेत्रामधील विसर्जन मिरवणूक मार्ग व इतर संवेदनशिल ठिकाणी नगरपरिषदांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. तसेच सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या मंडपमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गणेश विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी महसूल विभाग, पोलीस, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गाची संयुक्त पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करताना पोलीस प्रशासनाकडून आलेले प्रस्ताव संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने निकाली काढण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मिश्रा यांनी यावेळी दिल्या.