शेतात जाण्यासाठी रस्ता करा, नाहीतर जमिनी परत द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 07:05 PM2024-06-10T19:05:39+5:302024-06-10T19:05:56+5:30
चिखली-पेडगाव रस्ता प्रकरण : शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
संतोष वानखडे, वाशिम : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत चिखली ते पेडगाव (ता.रिसोड) या रस्त्याचे भिजत घोंगडे कायम असून, शेतात जाण्यासाठी महत्वपूर्ण असलेला हा रस्ता पूर्ण करावा अन्यथा रस्त्यासाठी विनामुल्य दिलेल्या आमच्या जमिनी परत करा, असे साकडे चिखली येथील शेतकऱ्यांनी १० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना घातले. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले.
रिसोड तालुक्यातील चिखली ते पेडगाव हा रस्ता सन २०२१-२२ मध्ये मंजूर झालेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी विनामुल्य जमिनी दिल्या. पेडगाव येथून रस्ता कामाला सुरूवात होऊन चिखलीपासून अंदाजे एक ते दीड किमी अंतराअगोदर रस्ता काम येवून थांबले आहे. काही शेतकऱ्याने या रस्ता कामास विरोध केल्यामुळे रस्ता काम थांबल्याचे निवेदनात नमूद आहे. या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पोलिस संरक्षणासाठी रिसोड पोलिस स्टेशन तसेच संबंधितांशी पत्रव्यवहारदेखील केला. परंतू, अद्यापही पोलिस संरक्षण मिळाले नसल्याने रस्ता काम रखडले आहे.
या पार्श्वभूमीवर चिखलीच्या शेतकऱ्यांनी १० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. पोलिस संरक्षणात रस्ता काम पूर्ण करावे, रस्ता काम पूर्ण न झाल्यास, न्याय न मिळाल्यास रस्त्यासाठी आम्ही दिलेल्या जमिनी परत कराव्या, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.