मालेगाव रुग्णालयाच्या अधीक्षकांचा प्रभार काढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:55 AM2018-01-10T01:55:20+5:302018-01-10T01:56:13+5:30
मालेगाव: मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला तसेच प्रभारी अधीक्षकांचा प्रभारही काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला विविध समस्यांनी कवेत घेतल्यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सचित्र वृत्त प्रकाशित करताच, आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी ९ जानेवारीला मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला तसेच प्रभारी अधीक्षकांचा प्रभारही काढला.
तीन वर्षांपूर्वी सुसज्ज इमारतीत मालेगाव ग्रामीण रुग्णालय स्थलांतरित झाले. अल्पावधीतच येथे भौतिक असुविधा व वैद्यकीय उपकरणांची उणिव जाणवते. येथे जनरेटरची सुविधा नाही. त्यामुळे वीजपुरवठा गूल झाला तर रात्री रुग्णांना अंधारातच राहावे लागते. ‘ईसीजी’ मशीन बंद आहे. पिण्याच्या पाण्याचीसुद्धा व्यवस्था नाही. यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीदेखील सोयीनुसार रुग्णालयात येत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ९ जानेवारीला वृत्त प्रकाशित करताच, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी मालेगाव ग्रामीण रुग्णालयाला सकाळी १0 वाजताच्या सुमारास भेट देऊन आढावा घेतला. कार्यालयीन वेळेत सर्व कर्मचार्यांनी रुग्णालयातच राहावे, अशा सूचना देतानाच, निवासस्थानी न राहणार्या कर्मचारी-अधिकारी तसेच दांडीबाज कर्मचार्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा डॉ. राऊत यांनी दिला. तसेच मालेगाव येथील प्रभारी अधीक्षकपदाचा पदभार डॉ. अविनाश झरे यांच्याकडून काढला असून, सदर प्रभार डॉ. संदीप वाढवे यांच्याकडे सोपविण्यात आला. यावेळी पं.स. सभापती मंगला गवई, नितीन काळे, नगर पंचायतचे आरोग्य सभापती गजानन सारस्कर, संतोष बनसोड आदींची उपस्थिती होती. यावेळी दक्षता समिती सदस्य नितीन काळे यांनीदेखील वरिष्ठांकडे ग्रामीण रुग्णालयातील विविध गैरसोयींसंदर्भात माहिती दिली.
दुपारच्या सुमारास आमदार अमित झनक यांनीदेखील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करीत समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राऊत यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत समस्या निकाली काढण्याच्या सूचना केल्या.