मालेगाव बाजार समिती निवडणूक: घडामोडींना वेग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 05:45 PM2018-06-22T17:45:19+5:302018-06-22T17:45:19+5:30
मालेगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी राजीनामा दिल्यानंतर, आता या पदासाठी २ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.
मालेगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी राजीनामा दिल्यानंतर, आता या पदासाठी २ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. सभापती, उपसभापती पदी वर्णी लागावी म्हणून राजकीय घडामोडींना वेग आला असून, यामध्ये कोण बाजी मारते याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे यांनी ६ जून रोजी तर उपसभापती प्रकाश अंभोरे यांनी ७ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकांकडे दिला होता. सदर राजीनामे मंजूर झाल्याने रिक्त पदाकरिता २ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. आमदार अमित झनक व माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव यांच्या सत्ताधारी गटाकडे स्पष्ट बहुमत आहे. यापूर्वी त्यांच्याच गटाचे सभापती व उपसभापती होते. त्यांच्या गटाकडे तेरा संचालक तर विरोधी गटात पाच संचालक आहेत. सत्ताधारी गटात रा.काँ. पक्षाचे पाच संचालक काँग्रेस पक्षाचे चार संचालक, शिवसेनाचे एक संचालक, व्यापारी वर्गातून दोन संचालक तर हमाल व मापारी गटातून एक संचालक आहेत तर विरोधी गटात माजी खासदार अनंतराव देशमुख समर्थक, आमदार विनायक मेटे समर्थक भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव समर्थक या सर्वांमिळून पाच संचालक आहेत. सभापती व उपसभपती हे सहकार क्षेत्रात महत्त्वाचे पद मानल्या जात असल्याने घडामोडींना वेग आला आहे. आमदार अमित झनक व माजी जि.प.अध्यक्ष दिलीपराव जाधव हे सभापती व उपसभापती पदासाठी कोणते नाव सूचवितात याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे माजी खासदार अनंतराव देशमुख समर्थक गजानन देवळे, आमदार विनाकयराव मेटे, माजी आमदार विजयराव जाधव या दिग्गजांची कोणती रणनिती राहणार, सत्ताधारी गटातील काही संचालकांना आपल्या तंबूत आणू शकतात काय याकडेही राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.