मालेगाव नगर पंचायतमधील कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न रेंगाळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 05:02 PM2018-04-11T17:02:12+5:302018-04-11T17:02:12+5:30
मालेगाव (वाशिम) : मालेगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायत अस्तित्वात यायला सुमारे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाही ३९ पैकी २६ कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
मालेगाव (वाशिम) : मालेगाव ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगर पंचायत अस्तित्वात यायला सुमारे तीन वर्षाचा कालावधी पूर्ण होत असतानाही ३९ पैकी २६ कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याशिवाय इतरही महत्वाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजाचा पुरता खोळंबा होत असून नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपंचायत कार्यालयात राज्यस्तरीय कर्मचारी आकृतीबंधानुसार ९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी मात्र केवळ ३ पदे भरलेली आहेत. मुख्याधिकाऱ्यांचा प्रभार रिसोड येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्याकडे आहे. सहायक अधीक्षक म्हणून पल्लवी शेळके, मिळकत पर्यवेक्षक संतोष बनसोड, तर सहायक कर निरीक्षक म्हणून मनोज सरदार कार्यरत असून सहायक समाज कल्याण माहिती जनसंपर्क अधिकारी, लेखापाल, लेखापरीक्षक, स्थापत्य अभियंता, पाणीपुरवठा मलनिस्सारण व स्वच्छता अभियान, नगर रचनाकार ही पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत.
जुन्या ग्रामपंचायतीत कार्यरत ३९ कर्मचाऱ्यांपैकी केवळ १३ कर्मचाऱ्यांचे नगर पंचायतीमध्ये समायोजन करण्यात आले असून २६ कर्मचारी यापासून अद्याप वंचित आहेत. त्यांचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकूणच कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात अनुशेषामुळे मालेगाव नगर पंचायतीअंतर्गत चालणाऱ्या कामांचा बोजवारा उडत असून नगारिकांमधूनही रोष व्यक्त होत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने रिक्त पदे तत्काळ भरून कामकाज सुरळित करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी जोर धरत आहे.