मालेगावात जोरदार पावसाची हजेरी!
By Admin | Published: July 14, 2017 01:44 AM2017-07-14T01:44:16+5:302017-07-14T01:44:16+5:30
पिकांना आधार: शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर मालेगाव तालुक्यात पावसाने बुधवार आणि गुरुवारी हजेरी लावली. त्यामुळे खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
मालेगाव तालुक्यात यंदा यावर्षी ६२ हजार १६३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोयाबीन ४७ हजार ९४९ हेक्टरवर, ज्वारी ३४३ हेक्टर जमिनीवर ,मक्का ५६ हेक्टर जमिनीवर, इतर तृण धान्य ११ हेक्टर जमिनीवर, तूर ९ हजार ६५७ हेक्टर जमिनीवर, मूग ११५८ हेक्टर जमिनीवर , उडीद २१३४ हेक्टर जमिनीवर, ती ८ हेक्टर जमिनीवर, तर कपाशी ३०७ हेक्टर जमिनीवर पेरण्यात आली आहे. त्याशिवाय तालुक्यात इतर पिकांमध्ये सद्यस्थितीत ऊस ५ हेक्टरवर, भाजीपाला पिके १५९ हेक्टरवर, मसाला पिके ३४७ हेक्टरवर, फळबाग ३७ हेक्टर जमिनीवर आहे. मात्र गेले तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांसह हतरही पिके सुकू लागली होती. दरम्यान, १२ जुलै रोजी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे . तालुक्यात आतापर्यंत खरिपाची ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने बुधवारपासून तालुक्यात हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आता शेतीच्या कामांना पावसानंतर वेग येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीमधील निंदण, खुरपणासह, इतरही कामे ठप्प झाल्यामुळे शेतमजुरांच्या हातालाही कामे मिळेनासी झाली होती.