मालेगाव ‘टीएचओ’ हाजीर हो..! फोटो व्हायरल झाल्यानंतर चौकशीसाठी बोलावले
By संतोष वानखडे | Published: June 25, 2023 05:55 PM2023-06-25T17:55:09+5:302023-06-25T17:55:22+5:30
या प्रकरणात मालेगाव टीएचओंना उद्या सोमवारी बोलावण्यात आल्याचे सांगितले.
वाशिम : कार्यालयीन वेळेत मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी (टीएचओ) हे टेबलावर पाय ठेवून सर्वसामान्य जनता, राजकीय पदाधिकाऱ्यांशी बोलतानाचे छायाचित्र वंचित बहुजन आघाडी युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष अनिल गरकळ यांनी सोशल मीडियावर व्हायरल करून याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. याची दखल घेत मालेगाव टीएचओंना सोमवार, २६ जून रोजी जिल्हा परिषदेत बोलाविण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य पूत्र अनिल गरकळ यांच्या तक्रारीनुसार, गरकळ हे २३ जून रोजी मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष बोरसे हे टेबलावर पाय ठेवून समोरच्यांशी बोलत होते. गरकळ यांनी या घटनेचे छायाचित्र काढून व्हाट्स ॲप स्टेट्सवर ठेवले तसेच फेसबुकवरही पोस्ट व्हायरल केली. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनता, राजकीय पदाधिकाऱ्यांशी नेमके कशा पद्धतीने बोलावे याचे भान ठेवायला हवे, मात्र मालेगाव टीएचओंनी गैरवर्तणूक केल्याने त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी अनिल गरकळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. यासंदर्भात जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य विषय समितीचे सभापती चक्रधर गोटे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणात मालेगाव टीएचओंना उद्या सोमवारी बोलावण्यात आल्याचे सांगितले.
मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कामानिमित्त गेलो असतो तेथे टीएचओ डाॅ. संतोष बोरसे हे टेबलवर पाय ठेवून समोरच्यांशी बोलत असल्याचे दिसून आले. ही बाब अशोभनीय असून, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे सीईओंनी आश्वासन दिले. - अनिल गरकळ, तक्रारकर्ते तथा जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी युवा शाखा
अनिल गरकळ आणि माझा कुठला काही संवाद नाही. या प्रकरणात मला काही बोलायचे नाही. - डाॅ. संतोष बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव