मालेगावकरांनी स्वयंस्फुर्तीने पाळला बाजारपेठ बंद
By admin | Published: August 18, 2016 12:42 AM2016-08-18T00:42:00+5:302016-08-18T00:42:00+5:30
व्यापा-यांनी बंद ठेवली प्रतिष्ठाने; पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी.
मालेगाव, (जि. वाशिम), दि. १७ : शहरात गत आठवडयापासून सशस्त्र दरोडेखोरांनी हैदोस घातल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या दहशतीमुळे शहरवासी भयभयीत झाल्याने तसेच स्थानिक पोलिस प्रशासनाकडून अद्यापपर्यंंंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नसल्याने शहरातील नागरिकांच्यावतीने बुधवारी मालेगाव शहर बंदची हाक दिली. व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने १00 टक्के कडकडीत बंद पाळला.
गत आठवड्यापासून शहरात दरोडेखोर व चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांचा तगडा पहारा आणि नागरिकांची सतर्कता असतानाही दरोडेखोर व चोरट्यांनी हैदोस घातल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले. चोरट्यांच्या दहशतीखाली वावरणार्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सर्वांंंनी सतर्कता बाळगावी याबाबत जनजागृती म्हणून बुधवारी मालेगाव बंदची हाक दिली होती. यासंदर्भात १६ ऑगस्ट रोजी मालेगाव तहसिलदारांना निवेदन दिले होते. बुधवारी सर्व व्यापारी व इतर व्यावसायीकांनी बंदला १00 टक्के प्रतिसाद देत स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवली.
स्थानिक तहसिल परिसर, शेलुफाटा, लहुजी पुतळा परिसर, पंचायत समितीमधील कॉम्प्लेक्स परिसर, मेनरोडमधील बाजारपेठ, आठवडी बाजार, सिव्हील लाईन, अकोला फाटा, गांधीचौक, मेडीकल चौक, जुने बसस्टँड आदी परिसरातील दुकाने कडकडीत बंद करुन पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीविषयी रोष व्यक्त केला.