रस्त्यांवरील खड्डयांमुळे मालेगावकर त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:14 PM2018-07-25T13:14:21+5:302018-07-25T13:15:35+5:30
विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे.
मालेगाव : शहराला नगरपंचायतचा दर्जा मिळून जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. असे असले तरी शहराच्या विकासाने आजही गती धरलेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे सद्य:स्थितीत खड्डा नाही, असा शहरातील एकही रस्ता शिल्लक नसल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने या रस्त्यांची किमान डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
मालेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १७ मधील सर्वच अंतर्गत रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले असून काही प्रभागांमधील नागरिकांना आजही कच्चा रस्त्यांवरूनच मार्गक्रमण करावे लागते. सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कच्चे रस्ते चिखलमय झाल्याने वाहनधारकांसह पादचाºयांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरातील मुख्य रस्ता असलेला आठवडी बाजार ते तहसील रोडलाही ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपातील खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही महिन्यांपूर्वी गांधी चौकातील रस्त्याला डांबरीकरण करण्यात आले. मात्र, सदर रस्ता अल्पावधीतच उखडून परिस्थिती पुर्वीपेक्षाही अधिक गंभीर झाली आहे. नगर पंचायतीने ही बाब गांभीर्याने घेवून पावसाळा असेपर्यंत रस्त्यांची किमान डागडुजी तरी करावी, अशी मागणी होत आहे.