VIDEO- गावाची पाणीटंचाई मिटविण्याचा त्याने उचलला विडा, एकटाच करतोय गावतलावाचे खोलीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 03:19 PM2018-04-19T15:19:33+5:302018-04-19T15:19:33+5:30
गावातील पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरित करूनही काहीच फायदा झाला नाही.
- नाना देवळे
वाशिम: गावातील पाणीटंचाई कायम मिटविण्यासाठी गावकऱ्यांना प्रेरित करूनही काहीच फायदा झाला नाही. अखेर दयाराम राठोड यांनी गावाची पाणीटंचाई कायम मिटविण्याचा विडा उचलला असून, ते एकटेच गावतलावाचे खोलीकरण करीत आहेत. हे अत्यंत हृदयस्पर्शी आणि तेवढेच प्रेरणादायक चित्र आहे. मंगरुळपीर तालुक्यातील माळशेलू या गावाचे.
राज्यातील दुष्काळाची झळ सोसणाऱ्या राज्यातील गावांत पाणी फाऊंडेशनच्या संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील माळशेलू या गावाने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला खरा; परंतु श्रमदानातून जलसंधारणाची कामे करण्यासाठी मात्र ग्रामस्थ कमालीचे उदासीन आहेत. जवळपास १८०० लोकसंख्या असलेल्या माळशेलूत पाणीटंचाईचे चटके ग्रामस्थांना वारंवार सोसावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन गावातील दयाराम राठोड यांनी वॉटर कप स्पर्धेसाठी पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या टीमच्या सहकार्याने या वॉटर हिरोने ग्रामस्थांना जलसंधारणाची कामे करण्यासाठी वारंवार प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. गावशिवारात पाणलोट उपचार व जलसंधारणासोबतच मनसंधारण व्हावे, याकरीता गावात दवंडी देऊन सभा घेतली गावकºयांना जलसंधारणाचे महत्व पटवून दिले; परंतु या गावातील लोकांकडून कवडीचाही प्रतिसाद त्याला लाभला नाही. त्यामुळे दयाराम राठोड यांनी स्वत:च जलसंधारणाच्या कामासाठी एकट्यानेच श्रमदान करण्याचा विडा उचलला. दयाराम राठोड यांनी प्रथम एकट्याच्याच श्रमदानातून स्वत:च्या घरी शोषखड्डा खोदला. तेवढ्यावर न थांबता त्यांनी गावतलावात अधिक पाणी साठविले जावे म्हणून या तलावाचे खोलीकरण सुरू केले ओ. गेले आठ दिवस ते एकटेच रखरखत्या उन्हात या तलावाचे खोलीकरण करीत आहेत. गावकºयांना जलसंधारणाच्या कामासाठी प्रेरित करता यावे म्हणून दयाराम राठोड यांनी ६ हजार रुपये खर्चून एक स्मार्ट फोनही विकत घेतला; परंतु गावकऱ्यांनी त्यापासून प्रेरणा घेणे, तर सोडाच उलट. त्याच्यावर आरोप करणे सुरु केले आहे. या कामाचा त्याला मोठा मोबदला मिळणार असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. ग्रामस्थांच्या आरोपामुळे दयाराम खिन्न झाले असले तरी, श्रमदानात मात्र त्यांनी कोणतीच कसर येऊ दिली नाही.
मला गावाची समस्या दूर करायचीय
गावकरी काहीही म्हणोत. कदाचित त्यांचा गैरसमज दूर करण्यात किंवा त्यांना प्रेरित करण्या इतपत माझ्याकडेच ज्ञान नाही. तथापि, त्यांच्या आरोपांमुळे मी खिन्न होत असलो तरी, त्याचे वाईट मात्र मला वाटत नाही. हे गाव माझे आहे. त्यामुळे गावकºयांसोबतही नाते आहेच. त्यासाठीच गावतलावाचे खोलीकरण करून गावाची समस्या मला दूर करायची आहे. मी यात यशस्वी झाल्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसतील. गावकºयांना त्याचा फायदा होईल, असा मला विश्वास आहे, अशी भावूक प्रतिक्रिया दयाराम राठोड यांनी दिली आहे.