मंगरूळपीर नगराध्यक्ष गजाला खान अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 04:45 PM2018-07-28T16:45:12+5:302018-07-28T16:46:50+5:30
मंगरूळपीर (जि.वाशिम): मंगरुळपीर नगर परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजाला यास्मिन खान यांनी नियमबाह्यरित्या पतीची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती केल्याने नगरविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयाने त्यांना नगराध्यक्षा पदावरून दूर करण्याचा निर्णय १६ जुलै रोजी दिल्याची माहिती २८ जुलैला प्राप्त झाली.
मंगरूळपीर (जि.वाशिम): मंगरुळपीर नगर परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजाला यास्मिन खान यांनी नियमबाह्यरित्या पतीची नामनिर्देशित सदस्यपदी नियुक्ती केल्याने नगरविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयाने त्यांना नगराध्यक्षा पदावरून दूर करण्याचा निर्णय १६ जुलै रोजी दिल्याची माहिती २८ जुलैला प्राप्त झाली. तसेच सहा वर्षांसाठी नगरसेवक म्हणून निवडून येण्यास डॉ. गजाला खान यांना अपात्र ठरविले आहे.
नगरविकास राज्यमंत्र्यांच्या न्यायालयाने केलेल्या निवाड्यानुसार, सर्वसाधारण निवडणूक पश्चात मंगरुळपीर नगर परिषदेत दोन नामनिर्देशित सदस्य नियुक्त करावयाचे होते. याकरीता ८ जानेवारी २०१७ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. नियमानुसार सभाध्यक्षा म्हणून नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांनी पदनिर्देशित अधिकारी असलेले जिल्हाधिकारी यांनी संख्याबळाच्या आधारे अनुज्ञेय असलेली दोन सदस्यांची नावे जाहिर करणे आवश्यक होते. सभागृहात संख्याबळ पाहता भाजप एक व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एक असे दोन अनुज्ञेय सदस्य पदे नामनिर्देशित सदस्य म्हणून घोषीत करणे अपेक्षीत होते. पण नगराध्यक्षा डॉ. गजाला खान यांनी स्वत:चे पती अॅॅड. मारूफ खान यांची नियुक्ती नियमबाह्यरित्या घोषीत केली. याप्रकरणी १२ एप्रिल २०१७ रोजी कॉंग्रेस नगरसेवक मिर्झा उबेद बेग झाहेद बेग व माजी नगराध्यक्ष अशोक परळीकर यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने वािशम जिल्हाधिकारी व अमरावती विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आले. अहवालानुसार नगराध्यक्षांनी अपल्या पदाचा गैरवापर केल्याचे सकृतदर्शनी सिध्द झाले. परंतू नियमानुसार त्यांना खुलासा सादर करण्याची संधी देण्यासाठी १८ सप्टेंबर २०१७ रोजी नोटीस देण्यात आली. यावर नगराध्यक्षा डॉ. खान यांनी २६ सप्टेंबर २०१७ ला निवेदनाद्वारे खुलासा सादर केला. खुलाशानंतरही तोंडी म्हणणे मांडण्यासाठी ९ मे २०१८ रोजी नगरविकास दालनात सुनावणी ठेवण्यात आली. त्यावेळी सर्वजण उपस्थित होते. परंतू नगराध्यक्षा अनुपस्थित होत्या. एकंदरीत प्रकरणी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी १६ जुलै रोजी निवाडा आदेश पारीत केले. त्यानुसार महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ च्या कलम ५५ ( अ ) व ५५ ( ब ) खालील तरतूदीनुसार डॉ. गजाला यास्मिन मारूफ खान यांना मंगरुळपीर नगराध्यक्षा पदावरून दूर करण्यात आले. तसेच आदेश दिनांकापासून सहा वर्षाच्या कालावधी करीता नगरसेवक म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.
राजकीय द्वेषापोटी भाजपच्या नगरसेवकांनी, आमदारांनी आपले पक्षाचे राज्यमंत्री यांचेवर प्रचंड दबाव निर्माण करून चुकीचा व बिनबुडाचा आदेश माझ्या विरुद्ध न्यायालयात प्रलंबित प्रकरणात पारित केला आहे. त्यावर लवकरच न्यायालयातून न्यायनिवाडा होईलच.
-डॉ. गजाला खान
नगराध्यक्ष, नगर परिषद, मंगरुळपीर