मंगरूळपीर : पहिल्या दिवशीच ७२ घरकुलांसाठी आठ-अ मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 04:22 PM2018-10-19T16:22:10+5:302018-10-19T16:22:33+5:30
मंगरूळपीर : मंगरूळपीर महसूल उपविभाग कार्यालयात १७ आॅक्टोबर रोजी डिजीटल सेवेचा शुभारंभ झाला असून पहिल्या दिवशीच ७२ घरकुलांसाठी आठ - अ मंजूर केले तर ९० नॉनक्रिमीलीअर व जातप्रमाणपत्रे निकाली काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : मंगरूळपीर महसूल उपविभाग कार्यालयात १७ आॅक्टोबर रोजी डिजीटल सेवेचा शुभारंभ झाला असून पहिल्या दिवशीच ७२ घरकुलांसाठी आठ - अ मंजूर केले तर ९० नॉनक्रिमीलीअर व जातप्रमाणपत्रे निकाली काढण्यात आली.
एरव्ही शासन दप्तरी महिनोमहिने फाईल, प्रकरणे धूळखात पडलेली असतात. वेळेवर अत्यावश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने सामान्य नागरीकांना अनेक सोईसुविधा व लाभापासून वंचीत राहावे लागते. नागरिकांना वेळेवर प्रमाणपत्र, कागदपत्रे मिळावी या उद्देशाने १७ आॅक्टोबरपासून स्थानिक महसूल विभागाने डिजीटल सेवेला प्रारंभ केला. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत या दोन तासात ९० नॉनक्रिमीलीअर व जात प्रमाणपत्रे डिजीटल स्वाक्षरीने मंजुर केली. या सुविधेत अर्जदाराने स्वत: आपले सरकार या अॅपवर किंवा मान्यताप्राप्त ई सुविधा केंद्रात आवश्यक कागदपत्रे अर्जासह द्यावयाचे आहेत. आॅनलाईन कागदपत्रासह हा अर्ज तहसीलदारांच्या तपासणीनंतर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जातो. तपासणीअंती उपविभागीय अधिकारी डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून सदर अर्ज मंजुर करतात. अर्जात मोबाईल क्रमांक व ईमेल पत्ता नमूद असल्यास अर्जाच्या प्रत्येक ‘अपडेट’ची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. मंगरूळपीर तालुक्यात सद्यस्थितीमध्ये शहरात ३ व ग्रामीण भागात ३४ ई सुविधा केंद्र शासनमान्य आहेत.
दरम्यान, गत काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली ७२ घरकुलासाठीची ‘आठ अ’ची प्रकरणेही निकाली काढण्यात आली. मंगरूळपीर तालुक्यात १ हजार १०४ घरकुल मंजूर झाली होती. यापैकी जागेच्या ८- अ अभावी ७३ मंजूर घरकुल अनेक दिवसांपासून प्रलंबीत होते. यामध्ये मुर्तीजापरू- २१, वनोजा- १४, धानोरा खूर्द- १२, गणेशपूर- ६, गिंभा- ५, जांब- ३, फाळेगाव, निंबी प्रत्येकी - २, धोत्रा, लाठी, सनगाव, जनुना प्रत्येकी - १ घरकुलासाठी जागा उपलब्धतासाठी ८-अ ‘मॅन्युअली’ मंजूर केले तर १ प्रस्ताव नामंजूर केला.