आंब्याचे दर आटोक्यात; मात्र विक्री मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:20+5:302021-05-11T04:43:20+5:30
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून प्रशासनाने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे इतर ...
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून प्रशासनाने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात ९ मेपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे इतर दुकानांसोबतच फळ विक्रेत्यांचा व्यवसायही ठप्प झालेला आहे. या संकटाचा परिणाम आंब्याचे दर घसरण्यावरही झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, सध्या वाशिमसह जिल्ह्यात हापूस (रत्नागिरी) प्रजातीच्या आंब्याचा दर ५०० ते ९०० रुपये प्रति डझन आहे. मात्र, विक्री मंदावल्याने अधिकांश आंबा सडण्याच्या मार्गावर आहे. यासह हापूस (कर्नाटक)चा दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो, केशर ८०, पायरी ४० रुपये आणि गावरान आंब्यालाही ४० ते ५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दरम्यान, कोरोनामुळे कडक निर्बंध लागू झाल्याने व्यावसायिकांकडून नव्याने आंबा बोलावणे बंद झाल्याने, शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
........................
विक्री ठप्प; आंब्याचे नुकसान
८ मेपर्यंत जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ असे चार तास फळ विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती. या काळात वाशिम शहरातील फळ विक्रेत्यांनी भरपूर प्रमाणात आंबा उपलब्ध केला. मात्र, ९ मेपासून कडक निर्बंध लागू होण्यासोबतच फळ विक्रीची दुकानेही बंद आहेत. यामुळे हापूससोबतच अन्य प्रजातींचा आंबाही जागीच सडत असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली.
....................
कोट :
दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हापूस, केशर, दशेरी, पायरी, लालबाग, गावरान आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्यानुसार, या वर्षीही विक्री होणारच असे गृहीत धरून ऐन वेळी धावपळ नको, म्हणून आंब्याची साठवणूक करण्यात आली. मात्र, ९ मेपासून कडक निर्बंध लागू झाल्याने आंबा विक्री पूर्णत: ठप्प होऊन नुकसान होत आहे.
- शे. अजीज शे. गफ्फूर
................
दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरी हापूसला ग्राहकांकडून विशेष मागणी होती. त्यानुसार, मोठ्या प्रमाणात या आंब्याच्या पेट्या बोलावल्या होत्या. यासह केशर, दशेरी हा आंबाही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. कोरोनामुळे मात्र विक्री मंदावली आहे. कडक निर्बंधाच्या काळातही काही प्रमाणात ग्राहकांकडून ऑर्डर येत आहेत. संबंधितांना आंबा घरपोच पुरविण्याची सोय केली जात आहे.
- शे. नजीर शे. गफ्फूर
...................
कोट :
दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी आंब्याची झाडे फळांनी अधिक प्रमाणात लदबदली आहेत. काही झाडांचा आंबा उतरविण्यात आला आहे. मात्र, कोरोनामुळे व्यापाऱ्यांकडून विशेष मागणी नाही. ग्राहकांकडून मागणी झाल्यास कोरोनाविषयक नियम पाळून संबंधितांना घरपोच आंबा पुरविण्यात येत आहे. मात्र, त्याचे प्रमाणही कमी असल्याने नुकसान होत आहे.
- दत्ता लोनसूने, आंबा उत्पादक
....................
माझ्या शेतात पिकणाऱ्या आंब्याची मी दरवर्षी वाशिमच्या बाजारपेठेत विक्री करतो. काही आंबा अकोला, हिंगोली या जिल्ह्यातही पाठविला जातो. या वर्षी मात्र व्यापाऱ्यांकडून आंब्याला विशेष मागणी नाही. यासह ९ मेपासून कडक निर्बंध लागू झाल्याने बाजारपेठेतही आंबा विक्री करता येणे अशक्य झाले आहे. परिणामी, नुकसान होत आहे.
- शिवाजी बोरकर, आंबा उत्पादक