मंगरुळपीरमधील मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह अखेर सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:06 AM2017-07-19T01:06:26+5:302017-07-19T01:06:26+5:30
मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या तळजापुर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: शहरालगत असलेल्या तळजापुर येथील मागासवर्गीय मुलांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृह दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. हे वसतीगृह यंदा सुरू न झाल्याने गोरगरीब व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेत लोकमतने ‘मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह बंद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले होते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता बाहेरगावी गेल्यानंतर खोली भाड्याने घेऊन शिक्षण घ्यावे लागते. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना ही बाब परवडणारी नसल्याने त्यांना पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे. ही बाब लक्षात घेत शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाज कल्याणमार्फत तालुकास्तरावर भव्य वसतीगृहाची निर्मिती करुन त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. शासनाच्या या निर्णयानुसार मंगरुळपीर येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह उभारण्यात आले, मात्र यंदाचे सत्र सुरू झाल्यानंतरही हे शासकीय वसतीगृह श् केवळ पाण्याचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होत होतेच. शिवाय घरुन शाळेत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागून शिक्षणाकडेही काळजीपूर्वक लक्ष देणे कठीण झाले होते. ही बाब गंभीर असून याकडे तात्काळ लक्ष देऊन वसतीगृह सुरु करणे नितांत गरजेची असल्याची मागणी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात येत होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या वसतीगृृहात आवश्यक सुविधांची पूर्तता करीत ते सुरू केले.
इतर सुविधांही उपलब्ध करणार
गतवर्षी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश मिळाले नाही, तसेच या ठिकाणी व्यायाम शाळा आहे. मात्र साहित्य नाही तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अशा अनेक समस्या या वसतीगृहात असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.