कोरोनाकाळातही मंगरूळपीर आगार सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:22+5:302021-08-17T04:47:22+5:30
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मर्यादा आल्या असून, प्रवाशांनी एसटीकडे पाठच केली आहे. अपवादात्मक स्थितीवगळता एसटीच्या ...
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर मर्यादा आल्या असून, प्रवाशांनी एसटीकडे पाठच केली आहे. अपवादात्मक स्थितीवगळता एसटीच्या बसगाड्या निम्म्या रिकाम्याच धावत असल्याचे चित्र दिसते. अशाही स्थितीत वाशिम जिल्ह्यातील आगारांनी चांगली कामगिरी केली असून, १ ऑगस्ट ते १० ऑगस्टच्या कालावधित मंगरूळपीर आगाराने ३१ लाख ३२ हजार रुपयांच्या उत्पन्नासह अकोला विभागात दुसरे आणि वाशिम जिल्ह्यात पहिले स्थान पटकावले. त्याशिवाय रिसोड आगाराने २८ लाख ४७ हजार, वाशिम आगाराने २८ लाख सात हजार, तर कारंजा आगाराने याच कालावधित २५ लाख ४९ हजार रुपयांची कमाई केली आहे.
---------
मंगरूळपीर आगाराच्या दहा दिवसांत ८६९ फेऱ्या
कोरोनाकाळात प्रवासी वाहतुकीला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसतानाही मंगरूळपीर आगाराने वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक फेऱ्या सोडल्या आहेत. या आगाराने दहा दिवसांच्या काळात २८४ नियतांच्या माध्यमातून ८६९ फेऱ्या चालविताना ९८ हजार ९५४ किलोमीटर अंतरात प्रवासी सेवा देत ३१ लाख ३२ हजार रुपयांची कमाई केली आहे.
--------
दहा दिवसांतील आगारनिहाय उत्पन्न
आगार - उत्पन्न (लाखांत)
वाशिम - २८.०७
कारंजा - २५.४९
रिसोड - २८.४७
मंगरूळपीर - ३१.३२
---------------
कोट : आगारात बसगाड्यांची संख्या कमी आहे. त्यात प्रवाशांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याने फेऱ्यांचे योग्य नियोजन करावे लागत आहे. बहुतांश वेळी फेऱ्या रद्द कराव्या लागतात, तर कधी जादा फेरीही सोडावी लागते. सहकारी कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे आगाराला अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात यश येत आहे.
-ए.के. मिर्झा,
आगारप्रमुख, मंगरूळपीर
-------------
160821\16wsm_1_16082021_35.jpg
कोरोना काळातही मंगरुळपीर आगार सुसाट