मंगरुळपीर पोलिसांनी पुन्हा पकडला तांदळाचा ट्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 04:57 PM2020-06-20T16:57:28+5:302020-06-20T16:57:42+5:30
लॉकडाऊन काळात तालुक्यात रेशनच्या धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याची चर्चा आहे.
मंगरूळपीर: मंगरूळपीर पोलिसांनी २० जूनच्या सकाळी तालूक्यातील कोळंबी येथे एक तांदळाचा ट्रक पकडला असून सदर ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला.
तालुक्यातील कोळंबी येथे तांदळाचा ट्रक भरणे सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. एम. एच. ३७ टि ५५५३ क्रमांकाच्या ट्रक चालकास विचारणा केली असता, त्याचे नाव अस्लम भेरिवाले असल्याचे सांगितले. तसेच ट्रक मालकाचे नाव श्यामसुंदर बाहेती असून ट्रकमध्ये २५ टन माल असल्याचेसुद्धा सांगितले. पोलिसांनी सदर ट्रक पोलीस ठाण्यात लावला असून याबाबत तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार साधत सदर माल रेशनचा आहे की नाही हे तहसील कार्यालयाच्या अहवालानंतर स्पस्ट होणार आहे. गत पाच दिवसांत महसूल विभागाने एक तर पोलिसांनी दोन ट्रक असे तांदळाचे एकूण तीन ट्रक पकडले. (तालुका प्रतिनिधी)
'त्या' तांदूळाचा भात शिजतोय कुठे ?
लॉकडाऊन काळात तालुक्यात रेशनच्या धान्याची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात भात शेतीतर कुणी शेतकरी करीत नाहीत. मग नेमका एवढा मोठ्या प्रमाणात तांदूळ येतो तरी कोठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचबरोबर ट्रकच्या ट्रक भरून सदर माल जातो तरी कुठे व त्या तांदूळाचा भात शिजतो कुठे ? हेसुद्धा पडताळून पाहणे आवश्यक आहे.
पाच दिवसात तांदळाचे तीन ट्रक पकडले. याबाबत गुन्हे दाखल करण्याचे अधिकारी पोलिसांना नाहीत. तहसिलदारांचे पत्र किंवा अहवालानंतरच याप्रकरणी कारवाई होणार आहे. तहसीलदारांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.