मंगरूळपीर तालूका होतोय वाळू तस्करीचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:54 AM2021-02-27T04:54:48+5:302021-02-27T04:54:48+5:30
मंगरूळपीर : कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून तालुक्यात रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गत ...
मंगरूळपीर : कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून तालुक्यात रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गत दोन वर्षात महसूल विभागाने ११ वाहनांना १५ लाख रुपये दंड केला आहे.
तालुक्यातील रेती तस्कर आजूबाजूच्या जिल्ह्यातसुद्धा रेतीचा पुरवठा करीत असल्याची माहिती असून, मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी सुरू असल्याने तालुका रेती तस्करीचे केंद्र बनत आहे. याची गंभीर दखल संबंधित विभागाने घेण्याची गरज आहे. दोन वर्षांपूर्वी येथील रेती तस्करीचे प्रकरण राज्यात गाजले होते. अधिकारी, कर्मचारी व रेती तस्करांच्या अभद्र युतीने त्यावेळी उच्छाद मांडला होता. परंतु त्यानंतर रेती घाटाचा लिलाव रखडल्याने एक वर्ष गेले. त्यानंतरचे एक वर्ष कोरोनामुळे वाया गेले .परंतु या कालावधीतही काहींनी चोरट्या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक करून साठवणूक केली. परंतु आता तर रेतीघाट सुरू झाले असल्याने रेती तस्करांनी खुलेआम वाहतूक सुरू केली आहे. रॉयल्टी नसताना, रॉयल्टीपेक्षा जास्त क्षमतेची वाहतूक, वाहनाची कागदपत्र पूर्ण नसणे, चालकाचा परवाना नसणे आदी कारणे असतांना वाहतूक सुरू आहे. हे सुरू असताना अधिकारी व कर्मचारी यांची भूमिकाही महत्त्वाची असून, रेतीच्या वाहनांची संपूर्ण चौकशी करणे, जास्तीत जास्त दंड करणे, आवश्यकता असल्यास आरटीओ यांची मदत घेणे व विशेषतः रात्रीच्या वेळी या तस्करीवर लक्ष देणे आदी बाबी महत्त्वाच्या आहेत.