'त्या' गायींच्या सांभाळाची जबाबदारी मंगरुळपीरच्या गोरक्षण संस्थेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:38 AM2021-03-07T04:38:24+5:302021-03-07T04:38:24+5:30
गेल्या काही दिवसांपासून म्हसणी, तोरणाळा, इंझोरीमार्गे रात्रीच्या वेळी गुरांची अवैध वाहतूक केली जात होती. अशातच ३ मार्च रोजी वाहने ...
गेल्या काही दिवसांपासून म्हसणी, तोरणाळा, इंझोरीमार्गे रात्रीच्या वेळी गुरांची अवैध वाहतूक केली जात होती. अशातच ३ मार्च रोजी वाहने रात्रीच्या वेळी जात असल्याचे इंझोरीतील ग्रामस्थांना दिसले. त्यावरून त्यांनी ही वाहने रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात एक वाहन तेथून निघून जाण्यात यशस्वी झाले, तर दुसरे वाहन ग्रामस्थांनी रोखून पाहणी केली. त्यात आठ गायी निदर्यतेने बांधून नेण्यात येत असल्याचे आढळले. त्यावरून इंझोरीचे पोलीस पाटील काळेकर यांनी बीट जमादाराला माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी एमएच-३२, जे २४७० या क्रमांकाच्या वाहनांत गायी कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी हे वाहन ताब्यात घेत दोन आरोपींवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला, तर गायींची कोंडवाड्यात रवानगी करण्यात आली होती. आता या गायींचा सांभाळ करण्याची जबाबदारी पोलिसांनी मंगरुळपीर येथील केशव गोरक्षण सेवा समितीकडे सोपविली असून, या गोरक्षण सेवा समितीने गायींची जबाबदारी घेतली आहे.
-------------
तीन गावांत आरोग्य तपासणी
इंझोरी : मानोरा तालुक्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आरोग्य विभागाकडून गावागावांत आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यात म्हसणी, तोरणाळा आणि रामगाव येथे तीन दिवसांत शेकडो ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली.
-------------
प्रकट दिन उत्सव साध्या पद्धतीने
इंझोरी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने इंझोरी येथे ५ मार्च रोजी भाविकांनी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साध्या पद्धतीनेच साजरा केला.