माणिकराव ठाकरे यांची मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:07 PM2018-09-30T13:07:23+5:302018-09-30T13:07:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर /भर जहॉगीर (वाशिम) : लोणार जि. बुलडाणा येथील २३ सप्टेंबरच्या पहाटे दरम्यान झालेल्या अपघातात भर जहागीर येथील तीन तर शिरपूर येथील दोन जण ठार झाले. मृतकाच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याबरोबरच त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी भर जहॉगीर, शिरपूर येथे सांत्वनपर भेट दिली.
सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीच्या वाहनाला ब्राम्हण चिकना गावाजवळ लक्झरी बसची धडक बसल्याने भीषण अपघात झाला होता. यामध्ये ज्ञानेश्वर वामन डोंगरे (१९), अरूण संजय कांबळे (२२), राजू भगवान कांबळे (२३) सर्व रा. भरजहागीर तसेच प्रवीण दशरथ कांबळे (२५) व गणेश सदाशीव बांगरे (३२) सर्व रा. शिरपूर असे पाच जण ठार झाले. शनिवार, २९ सप्टेंबर रोजी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी भर जहॉगीर व शिरपूर येथे भेट देऊन मृतकाच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिरपूर येथे आमदार अमित झनक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.दिलीप सरनाईक यांची उपस्थिती होती. मृतकाच्या कुटुंबियांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. मृतकाच्या वृद्ध माता, पित्यांना निराधार योजनेंतर्गत मानधन सुरू करून देण्यासाठी पुढाकार घेण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्या. मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतकाच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन आमदार अमित झनक यांनी दिले. यावेळी माजी सभापती डॉ. श्याम गाभणे, माजी सरपंच गणेश भालेराव, राजू पाटील, नंदकिशोर गोरे, उपसरपंच असलम गवळी, मोहिब खॉ पठाण, मुख्तार खॉ पठाण, अमित वाघमारे, प्रशांत क्षीरसागर, स्वप्नील येवले यांच्यासह ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान यावेळी माजी सभापती संजय शर्मा यांच्या मुलीच्या निधनाबद्दल माणिकराव ठाकरे, अमित झनक, दिलीप सरनाईक यांनी घरी जाऊन शर्मा यांची सांत्वनपर भेट घेतली.