मानोरा बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 05:15 PM2020-09-28T17:15:25+5:302020-09-28T17:15:34+5:30
बाजार समितीत प्रशासक नियुक्त होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत २३ सप्टेंबर रोजी संपली; परंतु कोरोना संसर्ग पृष्ठभूमीवर सध्याच नव्याने निवडणूक घेणे अशक्य असल्याने या बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बाजार समितीत प्रशासक नियुक्त होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात नव्याने निवडणूका घेणे कठीण आहे. त्यामुळे विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीला शासनाने स्थगिती दिली असून, संबंधित संस्थेवर प्रशासक नियुक्त केले जात आहेत. त्यात मागील महिन्यात वाशिम जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. आता राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदतही संपुष्टात येत असून, या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यात मानोरा बाजार समितीची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात आली होती. निवडणूक प्रक्रियेंतर्गत या बाजार समितीची निवडणूक २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊन नवे संचालक मंडळ सत्तेत येणे आवश्यक होते. ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे इतर बाजार समित्यांत प्रशासक नियुक्त होत असताना या पृष्ठभूमीवर मानोरा बाजार समितीत प्रशासकांची नियुक्ती होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, या बाजार समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्यासाठी संचालक मंडळाने प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्याने आता मानोरा बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली असून, ही मुदत संपल्यानंतरच येथे नव्याने निवडणूक होते की प्रशासकांची नियुक्ती केली जाते, ते कळू शकणार आहे.